John Abraham Says He Will Never Make Films Like Chhaava & The Kashmir Files : जॉन अब्राहम सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या कामात व्यग्र आहे. तो लवकरच ‘तेहरान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. माध्यमांच्या माहितीनुसार त्याचा हा चित्रपट २०१२ साली झालेल्या इस्रायली हल्ल्यावर आधारित आहे. अशातच अभिनेत्याने नुकतंच राष्ट्रवादी चित्रपटांबद्दल त्याचं मत मांडलं आहे. यावेळी त्याने ‘छावा’बद्दलही वक्तव्य केलं आहे.

जॉन अब्राहमने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने ‘छावा’ व ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटांबद्दल वक्तव्य केलं आहे. त्याने नुकतीच ‘इंडिया टुडे’ला मुलाखत दिली. यामध्ये त्याने सेन्सॉरशिपबद्दलही सांगितलं आहे. याबद्दल तो म्हणाला, “आपल्याला सेन्सॉरशिपची गरज आहे, पण ती ज्या पद्धतीने हाताळली जात आहे… त्यावर थोडे प्रश्नचिन्ह आहेत. ते आमच्याशी चांगले वागले आहेत, पण मीसुद्धा माझे चित्रपट जबाबदारीने बनवलेत. मी डाव्या किंवा उजव्या विचारसरणीचा माणूस नाहीये. मी राजकारणापासून दूर आहे.”

जॉनने पुढे उजव्या विचारसरणीचे चित्रपट सर्वाधिक प्रेक्षक मिळवत असून ही चिंताजन बाब असल्याचं म्हटलं आहे. अशा चित्रपटांना नफा आणि मोठ्या प्रमाणात प्रेक्षकपसंती मिळत असतानाही त्याला असे चित्रपट बनवायची इच्छा नसल्याचं त्याने म्हटलं आहे. अभिनेता म्हणाला, उजव्या विचारसरणीच्या चित्रपटांना मोठ्या प्रमाणात प्रेक्षकपसंती मिळत असून मला ही चिंताजनक बाब आहे.

अभिनेता पुढे कारण सांगत म्हणाला, “कारण जेव्हा तुम्ही चित्रपट निर्माता म्हणून स्वत:ला प्रश्न विचारता की तुम्ही कोणत्या प्रकारच्या चित्रपटांना पसंती देतात, तेव्हा मी व्यावसायिक चित्रपट करणार का की माझं जे म्हणणं आहे ते चित्रपटांतून मांडणार? आणि मी त्याबद्दल निवड केली आहे.”

‘छावा’ व ‘द काश्मीर फाईल्स’बद्दल जॉन अब्राहमची प्रतिक्रिया

अभिनेत्याला पुढे ‘छावा’ किंवा ‘द काश्मीर फाईल्स’सारखे चित्रपट बनवण्याची कधी इच्छा झाली का असं विचारण्यात आलेलं. यावर तो म्हणाला, “मी ‘छावा’ पाहिलेला नाही, पण मला माहीत आहे की लोकांना तो आवडला आहे आणि मी ‘द काश्मीर फाईल्स’ही पाहिलेला नाही. जेव्हा चित्रपट अतिराजकीय वातावरणात लोकांना प्रभावित करण्याच्या उद्देशाने बनवले जातात आणि अशा चित्रपटांना प्रेक्षकही मिळतात, तेव्हा ती गोष्ट मला भयावह वाटते. तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं, तर नाही. मला कधीच अशा प्रकारचे चित्रपट बनवण्याचा मोह झाला नाही आणि मी कधीच असे चित्रपट बनवणारही नाही.”

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाई केलेला चित्रपट आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८०० कोटींचं कलेक्शन केलं होतं. ‘छावा’ चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. दुसऱ्या बाजूला, ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपटही वादांमध्ये सापडला होता. हा चित्रपट काश्मिरी हिंदूंच्या निर्वासनाची कहाणी सांगतो. या चित्रपटाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये राष्ट्रीय एकात्मता विभागातील सर्वोत्तम चित्रपटासाठीचा नर्गिस दत्त पुरस्कार जिंकला.