अभिनेता जॉन अब्राहमच्या पत्नीचे नाव प्रिया रुंचाल आहे. प्रिया इन्व्हेस्टमेंट बँकर आहे. जॉन व प्रिया बॉलीवूड पार्ट्या तसेच सार्वजनिक कार्यक्रमांना क्वचितच हजेरी लावतात. असं जाणीवपूर्वक करत असल्याचं जॉनने म्हटलं आहे. जनॉ व प्रिया यांच्या लग्नाबद्दल फारशा बातम्या येत नाही, यामागचं कारण जॉनने सांगितलं आहे.
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत जॉनने म्हटलं की त्याच्याबद्दलच्या बातम्या माध्यमांमध्ये देण्यासाठी त्याने कधीच एजंटची मदत घेतली नाही. जॉन लग्नाबद्दल म्हणाला, “हा एक खूप जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय आहे, कारण माझ्या चित्रपटांचा माझ्या वैयक्तिक आयुष्याशी काहीही संबंध नाही. इतक्या वर्षांत, माझ्याकडे कधीच पीआर किंवा एजंट नाही. माझ्याबद्दलच्या बातम्या बाहेर पोहोचवेल, असं कोणीच नाही. त्यामुळे माझे चित्रपट येऊन गेले की माझ्याबद्दल बातम्या येत नाहीत. मी परत माझ्या स्पेसमध्ये जातो आणि जेव्हा माझ्याकडे एखाद्या विषयावर बोलण्यासारखं असतं तेव्हाच मी बोलतो.”
चित्रपटांचं शूटिंग नसतं तेव्हा जॉन काय करतो? याचा खुलासा त्याने केला. शूटिंग संपल्यावर जॉन शिलाँगमधील त्याच्या फुटबॉल अकादमीकडे लक्ष देतो. तसेच तो पटकथा लिहिण्यात वेळ घालवतो.
दारू पीत नाही जॉन अब्राहम
जॉनने त्याच्या व प्रियाच्या शिस्तबद्ध दिनचर्येबद्दल माहिती दिली. दोघेही बॉलीवूड पार्ट्यांना जाणं टाळतात, असं त्याने स्पष्ट केलं. “मी लग्नापूर्वी कधीही पार्ट्यांमध्ये गेलो नाही. मी नेहमीच त्यापासून दूर राहणं निवडलं. कारण पार्ट्यांमधील म्युझिकचा आवाज खूप मोठा असतो आणि मी दारू पीत नाही. मला दारू आवडत नाही. तसेच, मी खूप लवकर झोपतो आणि पहाटे ४-४.३० वाजता उठतो. मी उठल्यानंतर शक्य तितकं वाचन करतो आणि जागतिक बातम्याही वाचतो,” असं जॉन म्हणाला.

फिट राहायला जिमला जातो जॉन
हॉलिवूड रिपोर्टरला दिलेल्या एका मुलाखतीत जॉनने खुलासा केला होता की त्याने गेल्या ३५ वर्षांत एकही जिम सेशन चुकवलेलं नाही. “मला एखाद्या विशिष्ट चित्रपटासाठी सिक्स-पॅक हवे आहेत म्हणून मी ते करत नाही. ते माझ्याकडे आहेत. मी तंदुरुस्त आहे. मला मायग्रेनचा त्रास आहे, त्यादिवशी मी जिममध्ये नेहमीपेक्षा कमी वर्कआउट करतो. पण मी जिमला जाणं टाळत नाही,” असं जॉन अब्राहमने स्पष्ट केलं.
जॉन अब्राहम लवकरच ‘तेहरान’मध्ये झळकणार आहे. हा चित्रपट २०१२ मध्ये इस्रायली डिप्लोमॅट्सवर झालेल्या हल्ल्यावर बेतलेला आहे. हा चित्रपट १४ ऑगस्टला ZEE5 वर रिलीज होईल.