Johnny Lever Daughter Jamie Lever : ग्लॅमरस इंडस्ट्रीत यश मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अनेक नवोदित कलाकारांना अनेकदा इंडस्ट्रीत येण्याआधी काही अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातली सर्वांत मोठी अडचण म्हणजे कास्टिंग काऊच. बॉलीवूडमधील झगमगाटामागे कास्टिंग काऊचसारख्या अनेक वाईट घटना घडताना दिसतात. त्याबद्दल अनेक कलाकारांनी त्यांचे स्वत:चे अनुभवही शेअर केले आहेत. अशातच एका सुपरस्टारच्या मुलीनेही तिच्याबरोबर घडलेला वाईट प्रसंग शेअर केला आहे.
जॉनी लिव्हर यांची मुलगी जिमी लिव्हर हिने एक धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. ऑडिशनच्या नावाखाली एका व्यक्तीने तिला व्हिडीओ कॉलवर कपडे काढण्यास सांगितले. स्वतःला ‘आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा दिग्दर्शक’ म्हणवणारी ती व्यक्ती नंतर फसवणूक करणारा निघाली. मात्र, या घटनेमुळे तिच्या मनावर मोठा आघात झाल्याची भावना तिने व्यक्त केली.
जिमीने सांगितलं की तिनं इतरांकडून कास्टिंग काऊचबद्दल ऐकलं होतं; पण वडील जॉनी लिव्हर इंडस्ट्रीत असल्यामुळे ती अशा काही गोष्टींपासून वाचली होती. करिअरच्या सुरुवातीला तिच्याकडे मॅनेजर नव्हता. ती स्वतःच ऑडिशन्ससाठी संपर्क साधत होती. तिचा नंबर अनेक कास्टिंग एजंटकडे होता. अशातच एकदा तिला एका व्यक्तीकडून फोन आला, त्यानं ‘आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी कास्टिंग करत असल्याचं सांगितलं. त्यामुळे तिनं लगेच होकारही दिला. त्याबद्दल तिनं झूमला दिलेल्या मुलाखतीत सविस्तर सांगितलं.
त्याबद्दल जिमी म्हणाली, “मला सांगण्यात आलं होतं की, ऑडिशन व्हिडीओ कॉलवर होईल आणि दिग्दर्शक स्वतः असेल; पण संहिता (स्क्रिप्ट) शेअर केली जाणार नाही. मग मला एक लिंक पाठवण्यात आली आणि मी तो कॉल जॉइन केला. पण, समोरच्या व्यक्तीचा व्हिडीओ सुरू नव्हता. “मी व्हिडीओ ऑन करू शकत नाही. पण तू या भूमिकेसाठी अगदी परफेक्ट आहेस. काही गोष्टी टेस्ट करायच्या आहेत” असं तो म्हणाला.
त्यानंतर जिमी सांगते, “ही भूमिका ‘बोल्ड’ आहे. त्यामुळे मी विचारलं की, मला नेमकं काय करायचं आहे, तेव्हा त्या व्यक्तीनं सांगितलं – “कल्पना कर की, तुझ्यासमोर ५० वर्षांचा माणूस बसला आहे आणि त्याला तुला ‘आकर्षित’ करायचं आहे. नंतर त्यानं कपडे उतरवण्याचा सल्ला दिला. तसेच आणि शेवटी एक इंटिमेट सीन असल्याचंही सांगितलं.”
जिमी लिव्हर इन्स्टाग्राम पोस्ट
पुढे जिमी म्हणाली, “मी लगेच स्पष्ट केलं की, मला हे अजिबात कम्फर्टेबल वाटत नाही. मी स्क्रिप्ट असेल, तर त्यानुसार काम करते. त्यावर त्यांनी सांगितलं की, कोणतीही स्क्रिप्ट नाही. त्यामुळे तुला काही बोलायचं असेल किंवा दुसरं काही करायचं असेल, तर ते मोकळ्या मनानं कर.” त्यानंतर मी त्याला “यासाठी अजिबात तयार नाही” असं म्हटलं. तरीही तो म्हणाला, “हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे, तुला यामध्ये कास्ट करायचं आहे. मग मी स्पष्टपणे सांगितलं, “जर हेच अपेक्षित असेल, तर मी बोलायलासुद्धा तयार नाही” आणि मी लगेच व्हिडीओ कॉल बंद केला.”
कॉल बंद करताच जिमीच्या लक्षात आलं की, ही एक मोठी फसवणूक असू शकते. त्याबद्दल ती म्हणाली, “जर मी यादरम्यान काही केलं असतं, तर त्यांनी त्याचा व्हिडीओ बनवून माझा मानसिक छळ केला असता. पण सुदैवानं मी माझं डोकं वापरलं आणि त्यातून वेळीच बाहेर पडले. पण यामुळे मला फार धक्का बसला होता. कारण- मला याआधी असा अनुभव कधीच आला नव्हता.” तिच्या म्हणण्यानुसार, सगळ्यात भीतीदायक बाब म्हणजे ती जॉनी लिव्हरची मुलगी आहे हे माहीत असूनही त्यांनी तिला फसवायचा प्रयत्न केला.”