Johny Lever Talks About His Son Jessy lever’s Cancer : कलाकार असो व सामान्य माणूस मुलांना काही जरी झालं तरी त्यांना साहाजिकच काळजी वाटते. जॉनी लिव्हर यांच्या मुलाला अवघ्या लहान वयात गंभीर आजार झाला होता. डॉक्टरांनी त्यांच्या मुलावर उपचार करण्यास नकार दिला होता. त्यांनी एका मुलाखतीमध्ये याबाबत सांगितलं आहे.

आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना पोट धरून हसवणारे अभिनेते म्हणजे जॉनी लिव्हर. जॉनी लिव्हर यांच्या मुलाला जेसी लिव्हरला तो लहान असताना गंभीर आजार झाला होता. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करण्यास नकार दिलेला. जॉनी लिव्हर यांनी अभिनेत्री कुनिका सदानंद यांच्याशी संवाद साधताना याबाबत सांगितलं होतं.

जॉनी लिव्हर म्हणाले, “माझ्या मुलाला मानेमध्ये गाठ आली होती. त्यासाठी त्याच्यावर अनेक उपचार करण्यात आले. त्याची शस्त्रक्रियासुद्धा झाली; पण डॉक्टर त्याच्या मानेमधून ट्यूमरची गाठ पूर्णपणे काढू शकत नव्हते. तेव्हा डॉक्टरांनी ते माझ्या मुलावर उपचार करणार नाहीत. कारण- त्यामुळे त्याची दृष्टी जाण्याची शक्यता आहे. तसेच त्याला अर्धांगवायूचा धोका निर्माण होईल, असं सांगितलं होतं”.

जॉनी लिव्हर याबाबत पुढे म्हणाले, “मी माझ्या मुलाला रुग्णालयात असताना पाहिलं आहे. डॉक्टरांनी ट्यूमरची गाठ औषधांनी कमी व्हावी म्हणून त्याला गोळ्या दिल्या होत्या. तो दिवसाला ४०-५० गोळ्या खात असे. पण तरीसुद्धा त्याने काहीच फरक पडला नाही आणि ट्यूमरची गाठ वाढत चालली होती. तेव्हा तो जेमतेम १२ वर्षांचा होता. शाळेत इतर मुलं त्याची मस्करी करायचे. त्यावेळी मला जमेल ते सगळं मी त्याच्यासाठी केलं. त्याला हवं ते सगळं दिलं”.

मुलावर उपचार करण्याबाबत जॉनी लिव्हर पुढे म्हणाले, “आम्ही यूएसमध्ये न्यू जर्सीला ट्रिपला गेलो होतो. तेव्हा आम्ही सगळ्यांनी चर्चमध्ये जाण्याचं ठरवलं होतं. तिथे एक प्रिस्ट होते. त्यांनी आम्हाला पाहिल्यानंतर जेस्सीबद्दल विचारलं. तेव्हा मी त्यांना माझ्या मुलाच्या परिस्थितीबद्दल सांगितलं. त्यांनी मला स्लोन केटरिंग रुग्णालयात त्याला घेऊन जाण्यास सांगितले आणि म्हणाले की, देव त्याला बरा करेल”.

भारतात डॉक्टरांनी शस्त्रक्रियेमुळे मुलाची दृष्टी जाण्याची आणि त्याला अर्धांगवायूचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली असतानाही जॉनी लिव्हर यांनी तिथे डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली. जॉनी लिव्हर पुढे म्हणाले, “भारतात डॉक्टरांनी सर्व काही प्रतिकूल सांगितल्याने माझी पत्नी काळजी करीत होती; पण मी तिची समजूत काढली. माझे जर्सीमध्ये काही चांगले डॉक्टर मित्र होते. त्यांनी मला डॉक्टर जतीन शाह यांना भटण्याचा सल्ला दिला होता”.

“मी फार देव देव करणारा व्यक्ती नव्हतो; पण माझ्या मुलासाठी त्या काळी देवाकडे खूपदा प्रार्थना करत असे. शस्त्रक्रिया झाली तेव्हा मी खूप काळजीत होतो; पण डॉक्टरांनी मला त्याची शस्त्रक्रिया नीट झाल्याचं सांगितलं. त्यांनी त्याची ट्यूमरची गाठ काढली होती”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जॉनी लिव्हर यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं, मुलाची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांनी त्यांना असलेल्या सर्व वाईट सवयी सोडल्या आणि देवाचे आभार मानले. आता जेसी लिव्हर कर्करोगमुक्त असून, तोही एक अभिनेता म्हणून वावरतो आहे. सोशल मीडियावरही तो सक्रिय असतो. तर, जॉनी लिव्हर यांची मुलगी जेमी लिव्हरही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे.