दिग्गज अभिनेते कबीर बेदी त्यांच्या चित्रपटांइतकेच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिले. ७८ वर्षांच्या कबीर बेदींनी ४ लग्नं केली. ४ लग्नांपासून त्यांना तीन अपत्ये आहेत. कबीर यांनी त्यांच्या पहिल्या घटस्फोटाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. कबीर यांची पहिली पत्नी प्रतिमा गौरी एक डान्सर व मॉडेल होते. दोघांचं ७ वर्षांचं नातं कसं मोडलं, त्याबद्दल त्यांनी माहिती दिली.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत कबीर बेदी यांनी त्यांच्या पहिली पत्नी प्रतिमाबरोबरच्या सात वर्षांच्या नात्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या. कबीर व प्रतिमा यांनी १९६९ साली लग्न केलं. त्यांना पूजा बेदी व सिद्धार्थ बेदी ही दोन अपत्ये झाली. लग्नानंतर काही वर्षातच त्यांच्या नात्यात कटुता आली.
कबीर बेदी म्हणाले, “प्रतिमा व माझं लग्न झालं. मुलं झाली. आमचं नातं सात वर्षे टिकलं. पण नंतर विवाहबाह्य संबंधांमुळ अडचण येऊ लागली. त्यावेळी सोबत राहून लग्न वाचवण्यासाठी ओपन मॅरेज हा एकच पर्याय होता. पण नंतर तो पर्याय अयशस्वी ठरला. शेवटी आम्हाला घटस्फोट घ्यावा लागला.”
घटस्फोटाआधीच दोघेही बाहेर जोडीदार शोधू लागले होते
“ओपन मॅरेजमध्ये आम्ही दोघेही जोडीदार शोधत होतो. इतर लोकांना भेटायचो, बोलायचो. पण हे सोपं नव्हतं. कारण मला जेव्हा प्रतिमाच्या रोमँटिक नात्यांबद्दल समजलं तेव्हा माझ्यासाठी ते स्वीकारणं सोपं नव्हतं. मी हैराण झालो होतो. आधी मला वाटलं होतं की मला या गोष्टीची अडचण नसेल, पण तसं झालं नाही. मला त्रास झाला होता,” असं कबीर बेदी म्हणाले.
कबीर म्हणाले, त्या काळी सोशल एक्सपरिमेंट्सचा काळ सुरू होता. आम्हाला वाटलं की ओपन मॅरेजमुळे आमचं नातं टिकून राहील, पण तसं झालं नाही. कदाचित आम्ही त्यासाठी बनलो नव्हतो. नंतर आमचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर प्रतिमा आध्यात्माकडे वळली. तर, कबीर यांनी नंतर तीन लग्नं केली. आता ते त्यांची चौथी पत्नी परवीन दुसांजबरोबर राहतात.