२००९ साली आलेला ‘३ इडियट्स’ हा चित्रपट आजही अनेकांचा आवडता चित्रपट आहे. या चित्रपटात ‘द परफेक्शनिस्ट’ आमिर खान, आर. माधवन, शर्मन जोशी, करीना कपूर खान आणि बोमन इराणी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिराणी यांनी केले होते. ५५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाची कमाई ४०० कोटींहून अधिक झाली होती. या चित्रपटाला देशातच नाही, तर परदेशातही पसंती मिळाली होती.

हा चित्रपट आधी अभिनेत्री काजोलला ऑफर करण्यात आला होता; पण तेव्हा तिने तो नाकारला. हा चित्रपट नाकारण्याबद्दल काजोलने जवळपास १५ वर्षांनंतर तिचं मत व्यक्त केलं आहे. काजोल सध्या तिच्या आगामी ‘माँ’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचं सर्वत्र जोरदार प्रमोशन सुरू आहे. अशाच एका प्रमोशनमध्ये काजोलला ‘एखादा सुपरहिट ठरलेला चित्रपट न केल्याबद्दल नंतर पश्चात्ताप झाला का?’ असा प्रश्न विचारण्यात आला.

या प्रश्नाचं उत्तर देताना काजोल म्हणाली, “असं अनेकवेळा घडतं. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ‘३ इडियट्स’ चित्रपट. पण हा चित्रपट नाकारल्याबद्दल मला कोणताही पश्चात्ताप नाही. असं म्हटलं जातं, तुम्ही ज्यासाठी पात्र आहात ते तुम्हाला मिळतंच. त्यामुळे मला वाटतं की, मी त्या चित्रपटांशिवाय आणखीही खूप चांगलं काम केलं आहे.”

‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने ही प्रतिक्रिया दिली. राजकुमार हिरानी यांचा ‘३ इडियट्स’ या चित्रपटात प्रियाच्या भूमिकेसाठी पहिल्यांदा काजोलला विचारणा करण्यात आली होती. पण तिने ती नाकारली. ही भुमिका नाकारल्याबद्दल काजोल म्हणाली, “जर मला पटकथा आवडत नसेल, तर मी कोणत्याही प्रोजेक्टला नकार देताना जास्त विचार करत नाही”. काजोलने नकार दिल्यानंतर ही भूमिका करीना कपूरने केली.

दरम्यान, काजोलच्या आगामी ‘माँ’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, हा एक भयपट आहे. ज्यामध्ये एक आई आपल्या मुलीला वाचवण्यासाठी राक्षसांशी लढते. काही दिवसांपुर्वी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमध्ये चाहत्यांनी या चित्रपटाला चांगलीच पसंती दर्शवली. ट्रेलरच्या व्हिडीओवर अनेकांनी चित्रपटासाठी उत्सुकता व्यक्त केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येत्या २७ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ९० च्या काळापासून काजोलने तिच्या प्रत्येक भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तिच्या प्रत्येक भूमिकेला चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. त्यामुळे तिच्या ‘माँ’ चित्रपटातील भूमिकेसाठीही चाहते उत्सुक आहेत. काजोलचा ‘माँ’ हा चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलुगू आणि बंगाली भाषेतदेखील प्रदर्शित होणार आहे.