Shruti Haasan spoke about her fascination with astrology: अभिनेते कमल हासन हे त्यांच्या एकापेक्षा एक चित्रपट आणि वेगळ्या धाटणीच्या भूमिकांसाठी ओळखले जातात. अनेकदा ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतात. आता त्यांची मुलगी आणि अभिनेत्री श्रुती हासनने त्यांच्याबद्दल केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
अभिनेत्री श्रुती हासन एका मुलाखतीत म्हणालेली की, तिचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे. पण, कमल हासन यांचा देव किंवा ज्योतिषशास्त्र यावर विश्वास नाही. रणवीर अलाहाबादियाला दिलेल्या मुलाखतीत श्रुती हासन म्हणालेली, “मी जेव्हा मोठी होत होते, तेव्हा माझ्या घरात सर्जनशीलतेवर मोठा भर होता. घरी सर्व जण नास्तिक होते. आमच्या घरी कोणत्याही देवाची मूर्ती नव्हती. कालांतराने मी आध्यात्मिकतेकडे वळले. माझ्या वडिलांनी यामध्ये कधीही ढवळाढवळ केली नाही किंवा माझ्या श्रद्धेला विरोध केला नाही. जेव्हा मी लोकांना सांगते की त्यांचा देवावर विश्वास नाही, ते त्यांना आवडत नाही.
“माझे वडील लोकांना…”
आई-वडिलांबाबत श्रुती हासन म्हणालेली, “माझे वडील लोकांना एखाद्या थेरेपिस्टपेक्षा जास्त चांगले ओळखू शकतात. कारण- ते त्यांच्या वयाच्या चौथ्या वर्षापासून अभिनय क्षेत्रात काम करीत आहेत. ते माणूस म्हणून उत्तम आहेत. आता वयानुसार त्यांचा स्वभाव जास्त सौम्य झाला आहे. माझ्या आई-वडिलांच्या विचारांचा, त्यांच्या विविध गोष्टींमध्ये असलेल्या आवडीचा माझ्यावर प्रभाव आहे. पण, काही गोष्टींबाबत माझे वडील सीमारेषा आखतात. उदाहरणार्थ- मी जर त्यांच्याबरोबर ज्योतिषशास्त्राबद्दल बोलायला गेले, तर ते मला घराबाहेर काढतील.”
मूर्तिपूजेकडे वळण्याबाबत श्रुती म्हणालेली मला वाटते की, याचा माझ्या कुटुंबातील मातृसत्ताक वंशाशी काहीतरी संबंध आहे. माझ्या कुटुंबातील माझ्या महिला पूर्वज होत्या, त्या मूर्तिपूजा करीत होत्या. त्यामुळे मी मूर्तिपूजा करण्याकडे, अध्यात्माकडे वळले असेन.
याच मुलाखतीत अभिनेत्रीने असेही कबूल केले की, तिला तिच्या वडिलांबाबत सहानुभूती वाटते. कारण- ती लहानपणापासून हट्टी आहे. तिला हव्या त्या गोष्टी ती करते. महत्त्वाचे म्हणजे तिच्या वडिलांनी कोणतीही गोष्ट करण्यापासून तिला कधीच रोखले नाही. अभिनेत्री म्हणाली की, माझ्या वडिलांना अजिबात टॅटू आवडत नाही; पण मी पाच टॅटू काढले आहेत.
दरम्यान, वडिलांप्रमाणे श्रुतीही अभिनय क्षेत्रात काम करते. तसेच, तिने आजपर्यंत अनेक गाणीदेखील गायली आहेत.