Kangana Ranaut : बॉलीवूडमधील कायम चर्चेत असणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे कंगना रणौत. अभिनेत्री म्हणून करिअर सुरुवात करणाऱ्या कंगना राजकारणातही तितक्याच सक्रिय आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बहुमताने निवडून आल्यानंतर कंगना सध्या हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून भाजपाच्या खासदार म्हणून काम करीत आहेत.
कंगना यांच्या या राजकीय प्रवासाला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं आहे आणि या एक वर्षाच्या अनुभवाबद्दलल त्यांनी नुकतंच ‘आत्मन इन रवी’ (AiR) या पॉडकास्टमध्ये राजकीय अनुभवांबद्दल चर्चा केली. या चर्चेत कंगना यांनी राजकारणात त्यांना सध्या तितकासा आनंद मिळत नसल्याचं सांगितलं. त्याशिवाय त्यांना राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नाही, असं मतही व्यक्त केलं.
या पॉडकास्टमध्ये कंगना म्हणाल्या, “मला राजकारण आवडत आहे, असं मी म्हणणार नाही. कारण- मला याची काहीच पार्श्वभूमी नाही; पण मला ते जमत आहे आणि त्याची मजा येत आहे. मी हे असं काम याआधी कधीच केलेलं नाही. मी कधी लोकांची सेवा करण्याचा विचार केला नव्हता. माझी यापूर्वीची भूमिका आणि आता मी खासदार झाल्यानंतर आलेली जबाबदारी यात खूप फरक आहे.”
कंगणा रणौत इन्स्टाग्राम पोस्ट
पुढे त्या म्हणाल्या, “मी महिलांच्या हक्कांसाठी लढली आहे; पण हे वेगळं आहे. लोक माझ्याकडे तुटलेल्या गटार आणि नाल्यांच्या समस्या घेऊन येतात. मी त्यांना सांगते की, हा राज्य सरकारचा मुद्दा आहे आणि मी एक खासदार आहे. पण यावर ते म्हणतात, ‘तुमच्याकडे पैसा आहे. तुम्ही आपला पैसा वापरा आणि हे काम करा.'”
त्यानंतर कंगना यांना भविष्यात पंतप्रधान होण्याची इच्छा आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला, यावर त्या उत्तर देत म्हणाल्या, “मला वाटत नाही की, मी पंतप्रधान होण्यासाठी पात्र आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेली आवडही माझ्यात नाही. समाजसेवा ही माझी पार्श्वभूमी कधीच नव्हती. मी खूप स्वार्थी जीवन जगले आहे.”
दरम्यान, कंगना यांनी दिग्दर्शक अनुराग बासू यांच्या ‘गँगस्टर’ चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी ‘वो लम्हे’, ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘राज’, ‘फॅशन’, ‘काइट्स’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ यांसारख्या काही चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर आता त्या राजकारणात सक्रिय आहेत.