लोकप्रिय अध्यात्मिक गुरु सद्गगुरू जग्गी वासुदेव यांच्या मेंदूवर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. बुधवारी (२० मार्च रोजी) त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याची माहिती समोर आली. त्यांना काही दिवसांपूसन डोकं दुखत होतं आणि उलट्या होत होत्या, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या एमआरआय रिपोर्टमध्ये मेंदूला सूज आल्याचं आणि रक्तस्त्राव झाल्याचं दिसून आलं, त्यानंतर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याच्या बातम्या आल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे.
जग्गी वासूदेव यांचे रुग्णालयातील काही फोटो व्हायरल झाले होते. कंगना एक्स पोस्टमध्ये म्हणाली, “सद्गगुरूंना आयसीयूच्या खाटेवर पाहून मला जाणवलं की त्यांचं अस्तित्व नश्वर आहे. याआधी कधीच वाटलं नाही की ते हाडं, रक्त व मांसाचे बनलेले आहेत. मला असं वाटलं जणू देवच कोसळले आहेत. मला वाटलं ही धरती हलतेय आणि आकाशाने मला एकटं सोडलंय. माझं डोकं गरगरतंय. मी हे वास्तव समजू शकत नाहीये आणि मी ते स्वीकारूही शकत नाहीये. मला असं वाटतंय जणू मी तुटलेय, जगभरातील लोक व त्यांचे भक्त सर्वांनाच माझ्याइतकं दुःख होतंय. त्यांनी लवकरात लवकर बरं व्हावं नाहीतर सूर्य उगवणार नाही, ही धरती हलणार नाही.”
कंगना रणौतव्यतिरिक्त उपासना कोनिडेला, शेखर कपूर, रणवीर शौरी यांच्यासह अनेक कलाकारांनी जग्गी वासूदेव यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली, तसेच ते लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना केली. सोशल मीडियावर त्यांचे अनुयायीही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करत आहेत.
मोठी बातमी! अध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर तातडीची मेंदू शस्त्रक्रिया
२० मार्च रोजी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात डॉ. विनित सुरी, डॉ. प्रणव कुमार, डॉ. सुधीर त्यागी आणि डॉ. एस. चटर्जी यांनी जग्गी वासूदेव यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया केली. ते बरे होत असून आता त्यांची प्रकृती चांगली आहे, अशी माहिती ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिली.