अभिनेत्री कंगना रणौतचा जन्म हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील एका लहान गावात झाला. ती तिच्या आई-वडिलांची दुसरी मुलगी आहे. तिला रंगोली नावाची थोरली बहीण आहे आणि एक धाकटा भाऊ आहे. कंगनाला एक मोठा भाऊ होता, पण त्याचा मृत्यू झाला, असा खुलासा तिने केला आहे.
बहीण रंगोलीपेक्षा एक मोठा भाऊ होता. त्याचं नाव हिरो होतं. जन्मानंतर अवघ्या १० दिवसांत त्याचं निधन झालं. त्यामुळे नंतरच्या सर्व भावंडांचा जन्म घरीच झाला. कुटुंबातील गरोदर महिलांना प्रसूतीसाठी रुग्णालयात नेण्यात येत नव्हतं, असा खुलासा कंगनाने केला.
हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली, “माझ्या आईला पहिला मुलगा झाला होता, पण तो दगावला. जन्मानंतर अवघ्या १० दिवसांतच तो गेला. माझ्या वडिलांनी त्याचे नाव हिरो ठेवले होते, त्यामुळे त्याला गमावणं हा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता. त्याचा जन्म रुग्णालयात झाला होता, त्याचं वजन ३.५ किलो होतं आणि त्याला कोणतीही समस्या नव्हती. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे मुलाचा मृत्यू झाला, असं माझ्या आईला वाटत होतं. त्यांनी त्याची नाळ चुकीच्या पद्धतीने कापली, असं तिचं म्हणणं होतं. या घटनेनंतर माझी आजी म्हणाली की यानंतर आईची प्रसूती रुग्णालयात होणार नाही. या घटनेनंतर, माझ्या आईला तीन अपत्ये झाली, काकूला दोन अपत्ये झाली. आम्हा सर्व भावंडांचा जन्म एकाच घरात, एकाच खोलीत झाला. कुणालाच रुग्णालयात नेण्याची परवानगी नव्हती.”
मुलींना खूप अपमानित केलं जायचं- कंगना रणौत
तिच्या घरात पितृसत्ताक सत्ता कशी खोलवर रुजली होती, लोक कशा टिप्पण्या करायचे, याबद्दल कंगना रणौतने सांगितलं. “माझ्या आई-वडिलांना आता या गोष्टींबद्दल लाज वाटते, पण त्याकाळी कुटुंबात मुलींना खूप अपमानित केलं जायचं, त्यांची खिल्ली उडवली जायची. ‘हिला या गोष्टी शिकवल्या नाहीस, हिला घरातच ठेवा नाहीतर ही मोठ्या मुलीचं लग्न होऊ देणार नाही’, अशा गोष्टी लोक माझ्याबद्दल बोलायचे. यामुळे माझ्या भावंडांबरोबरच्या नात्यावर परिणाम झाला. बरेचदा मला एकटेपणा जाणवायचा,” असं कंगना रणौत म्हणाली.
…अन् आईने बाहुल्या फेकून दिल्या
मासिक पाळी उशीरा आल्याने आईने बाहुल्या फेकून दिल्या होत्या, तो एक प्रसंग कंगना रणौतने सांगितला. “माझ्या सर्व मैत्रिणींना सहावी ते नववीच्या दरम्यान मासिक पाळी आली, पण मला आली नव्हती. त्यामुळे माझ्या आईला काळजी वाटत होती. त्यावेळी मला बाहुल्यांचं वेड होतं. माझ्याकडे खूप साऱ्या बाहुल्या होत्या. एके दिवशी, माझी आई खूप रागावली. ‘आधीच तुला मासिक पाळी आलेली नाही आणि हिला अजूनही बाहुल्यांशी खेळायचंय,’ असं म्हणत तिने त्या फेकून दिल्या होत्या. बाहुल्यांमुळे मला पाळी वेळेवर येत नसल्याचं तिला वाटत होतं. मग एके दिवशी, मी सकाळी उठले तेव्हा मला रक्ताचे डाग दिसले. मी घाबरले होते, पण माझी आई आनंदी होती की मला अखेर मासिक पाळी सुरू झाली,” असं कंगना रणौत म्हणाली.