कंगना रणौत ही तिच्या अभिनयाबरोबर स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. ती अनेकदा तिची मतं सोशल मीडियावर मांडत असते. नुकतीच अमेरिकेतील जॉर्जिया शहरात एका भारतीय विद्यार्थ्याची भिकाऱ्याने निघृण हत्या केली. या दुर्दैवी घटनेबद्दल कंगना रणौतने तिची प्रतिक्रिया दिली आहे.
कशी झाली भारतीय विद्यार्थ्याची हत्या?
अमेरिकेत एमबीएचं शिक्षण घेणाऱ्या २५ वर्षांचा भारतीय तरुण विवेक सैनीची एका भिकाऱ्याने डोक्यात हातोडी घालून हत्या केली. या हत्येची दृश्ये कॅमेरात कैद झाली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. जूलियन फॉकनर असं या खून करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. विवेक सैनीने या बेघर आरोपीची मदत केली होती. एका दुकानात पार्ट टाइम काम करणाऱ्या विवेकने या बेघर आरोपीला दुकानात थंडीपसून बचाव करण्यासाठी दुकानात बोलावून आसरा दिला. त्याला खाऊ पिऊ घातलं. थंडी असल्याने तो चादरीची मागणी करत होता पण त्याच्याजवळ चादर नसल्याने विवेकने त्याला स्वेटर दिलं. त्याला तीन ते चार दिवस मदत केल्यानंतर विवेकने त्याला जाण्यास सांगितले. यावर संतापून आरोपीने विवेकच्या डोक्यात हातोडीने हल्ला केला. ज्यामुळे विवेकचा मृत्यू झाला. ही घटना १६ जानेवारी रोजी घडली.
हेही वाचा… आयरा खान व नुपूर शिखरेने हनीमूनला गेल्यावर काढले मॅचिंग टॅटू, बालीतून शेअर केले फोटो
या घटनेबद्दल कंगना रणौतची प्रतिक्रिया
या हत्येच्या घटनेबाबत कंगनाने आपलं मत तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर मांडलं आहे. एका वृत्तपत्रातील बातमीचा फोटो शेअर करत ती म्हणाली, “आजचा विचार, कधीकधी ज्यांना मदत करू नये त्यांनाच आपण मदत करतो आणि त्यानंतर त्याचा त्रास आपल्यालाचं जास्त होतो.”
दरम्यान, विवेक सैनीच्या खूनाच्या घटनेवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बेघर व्यक्तीला मदत केल्यामुळे या तरुणाला आपला जीव गमवावा लागला.