बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्वाश्रमीचे पती आणि उद्योगपती संजय कपूर यांचं वयाच्या ५३ व्या वर्षी गुरुवार, १२ जून रोजी लंडनमध्ये निधन झालं. करिश्माचे पूर्वाश्रमीचे पती संजय कपूर यांचं पोलो खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती सूत्रांनी इंडिया टुडेला दिली. त्यांच्या अकस्मात मृत्यूमुळे कुटुंबीय आणि मित्रमंडळींना मोठा धक्का बसला आहे. दिवंगत संजय कपूर यांच्या निधनानंतर अनेकांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे.
संजय कपूरचे जवळचे मित्र तसेच उद्योगपती-लेखक-अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुहेल सेठ यांनी एक्स पोस्ट शेअर करत ही दु:खद बातमी सर्वांना दिली आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, संजयच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, संजय कपूर गार्ड्स पोलो क्लबमध्ये पोलो खेळत असताना अचानक त्यांना गुदमरल्यासारखे वाटले. नंतर त्यांनी खेळ थांबवण्याची विनंती केली आणि ते मैदानाबाहेर गेले. वृत्तांनुसार, संजय कपूर यांच्या तोंडात मधमाशी गेली होती आणि तिने घशात दंश केल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
यावर अभिनेत्री कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे. संजय कपूर यांच्या निधनाला तिने ‘दुःखद’ आणि ‘अविश्वसनीय घटना’ म्हटलं आहे. याबद्दल अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते, “संजय कपूर (करिश्मा कपूरचा एक्स पती) पोलो ग्राउंडवर होता, तेव्हा त्याच्या तोंडात एक मधमाशी गेली (हो, पोलो ग्राउंडवर मधमाशी होती) तिने दंश केला आणि त्याची श्वासनलिका बंद झाली.”

यापुढे तिने “यामुळे त्याला श्वास घेता येत नव्हता; म्हणून त्याने खेळ थांबवण्यास सांगितले. पण त्यानंतर लगेचच हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. ही एक दुःखद बातमी आहे. मी २०२५ मध्ये आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्व विचित्र घटना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे.” असं म्हटलं आहे. तसंच तिने पुढे या पोस्टद्वारे “सर्वांनी सुरक्षित रहा आणि देवाची प्रार्थना करत रहा” असं आवाहनही केलं आहे.
दरम्यान, करिश्माने २००३ मध्ये संजय कपूर यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. मात्र, लग्नानंतर काही वर्षांतच या दोघांमध्ये वाद निर्माण झाले होते. २०१४ मध्ये संजय व करिश्माने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. करिश्माने संजय कपूर आणि त्यांच्या आईविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला होता. संजय यांच्यावर शारीरिक शोषण आणि त्यांचे दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याचा आरोप करिश्माने केला होता.