Kareena Kapoor Reveals Her Daily Routine: कलाकार त्यांच्या आरोग्याची, त्वचेची कशी काळजी घेतात, कोणत्या पद्धतीचा व्यायाम करतात, याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता असते. ते स्वत:ला कसे तंदुरुस्त ठेवतात, त्यांची दिनचर्या काय असते, याबद्दल चाहत्यांना जाणून घ्यायचे असते.
आता बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरने तिची जीवनशैली कशी आहे, तिची दिनचर्या काय आहे यावर वक्तव्य केले. करीना कपूरने नुकतीच नॉड मॅगझीनला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या कामाबाबत वक्तव्य केले. अभिनेत्री म्हणाली, “मला विविध भूमिका साकारायच्या आहेत. आता किती भूमिका करते यापेक्षा त्या भूमिका कशा आहेत, याला जास्त महत्त्व आहे. ज्या भूमिका मला आव्हाने देतील, माझ्यातील उत्साह वाढवतील, अशा भूमिका मला साकारायच्या आहेत. मी आताच्या तरुण कलाकारांना बघते, जे एका गोष्टीकडून दुसऱ्या गोष्टीकडे पळत असतात. मला आनंद आहे की मी आता या सगळ्याच्या पुढे आले आहे.”
मला स्वत:चा वेळ मिळावा…
पुढे अभिनेत्रीने तिच्या दिनचर्येविषयी खुलासा केला. अभिनेत्री म्हणाली, “मी माझं वेळापत्रक बदललं आहे. मी आता सायंकाळी ६ वाजता जेवण करते. रात्री ९ वाजता घरातील लाइट बंद होतात. मी सकाळी व्यायामासाठी आणि मला स्वत:चा वेळ मिळावा यासाठी लवकर उठते. आता माझ्या मित्र-मैत्रिणींना माहीत आहे की मी त्यांच्याबरोबर पार्टीसाठी येईन, ही त्यांनी अपेक्षा केली नाही पाहिजे आणि ते त्याचा आदर करतात.”
जेव्हा करीनाचे कुटुंब एकत्र असते, तेव्हा त्या सगळ्यांना एकत्र जेवण बनवणे आवडते असेही अभिनेत्री म्हणाली. करीना म्हणाली, “जेव्हा आम्ही एकत्र असतो, तेव्हा आम्हाला एकत्र जेवण बनवणे आवडते. सैफ अली खानला केरळमधील खाद्य पदार्थ बनवायला आवडतात. तो नेहमी वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवत असतो. मला दिवसातील एक वेळचे जेवण हवे असते, त्यामध्ये मी कोणतीही तडजोड करू शकत नाही.”
काम व खासगी आयुष्य या दोन्हीमध्ये समतोल साधण्याबाबत करीना म्हणाली, “मला कोणत्यातरी पुरस्कार सोहळ्यामध्ये दिसायचे आहे, म्हणून माझ्या मुलांना घरी एकटे सोडणे योग्य वाटत नाही. त्यापेक्षा मी माझ्या पतीबरोबर घरी बसून एक वाईनचा ग्लास पिणे पसंत करेन. काम व वैयक्तिक आयुष्य यामध्ये समतोल साधणे हे पूर्णत: माझ्यावर अवलंबून आहे.”
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर करीना कपूर २०२४ मध्ये क्रू व सिंघम अगेन या दोन चित्रपटांत दिसली आहे. दोन्ही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगलेच यश मिळाल्याचे पाहायला मिळाले. सध्या ती दायरा या चित्रपटासाठी शूटिंग करत आहे.