Sunjay Kapur Property : दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या तब्बल ३०,००० कोटी रुपयांच्या मालमत्तेवरील वादात एक नवीन ट्विस्ट आला आहे. बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या संपत्तीतून वाटा मिळवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. करिश्मा ही संजय यांची दुसरी पत्नी होती. संजय व करिश्माला समायरा व कियान ही दोन अपत्ये आहेत.

ई-टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, समायरा व कियान भावंडांनी त्यांची सावत्र आई प्रिया कपूर (संजय कपूरची तिसरी पत्नी) हिने त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी बनावट मृत्युपत्र बनवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत दिवाणी खटला दाखल केला आहे.

समायरा व कियान यांनी कायदेशीर पालक म्हणून त्यांच्या आईच्या (करिश्मा कपूर) माध्यमातून वडिलांच्या संपत्तीच्या विभाजनाविरुद्ध कोर्टाने मनाई आदेश द्यावा, अशी मागणी केली आहे. तक्रारीनुसार, वडिलांच्या मृत्यूच्या वेळी त्यांच्या मालमत्तेबद्दल पूर्ण माहिती नव्हती, असा मुलांचा युक्तिवाद आहे. त्यांना माहीत असलेल्या मालमत्तेची प्रत त्यांनी जोडली आहे, पण डिफेंडंट क्रमांक १ (प्रिया कपूर) हिने संपत्तीचे तपशील लपवल्याचा आणि मालमत्तेची संपूर्ण रक्कम उघड न केल्याचा आरोप केला आहे.

वडील संजय कपूर यांचे १२ जून २०२५ रोजी विंडसर, यूके येथे पोलो खेळत असताना निधन झाले, तेव्हापर्यंत त्यांच्याशी जवळचं नातं होतं. त्यांच्याबरोबर प्रवास करायचो, सुट्ट्यांमध्ये फिरायला जायचो आणि बिझनेसबद्दलही माहिती होती, असा युक्तिवाद मुलांनी केला आहे.

प्रिया कपूरने संजय कपूर यांचे मृत्युपत्र नसल्याचा दावा केल्याचा आरोप मुलांनी केला आहे. त्यावेळी संजय कपूरची सर्व मालमत्ता आर.के. फॅमिली ट्रस्टच्या ताब्यात असल्याचं प्रियाने म्हटलं होतं. नंतर २१ मार्च २०२५ या तारखेला प्रियाने एक दस्तऐवज सादर केला, ते संजयचे मृत्युपत्र असल्याचा दावा प्रियाने केला, त्यामुळे ते बनावट असू शकतं, असा संशय मुलांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, संजय कपूर यांच्या संपत्तीसंदर्भातील कायदेशीर वादात अनेक जणांचा समावेश आहेत. आता करिश्मा कपूर व संजय कपूर यांची मुलगी आणि अल्पवयीन मुलांनी कोर्टात धाव घेतली आहे. कोर्टात मुलांचे प्रतिनिधीत्व करिश्माने केले आहे. खटल्यात पहिली प्रतिवादी प्रिया कपूर, दुसरा प्रतिवादी तिचा मुलगा आणि तिसरी प्रतिवादी संजय कपूर यांची आहे. तर चौथी प्रतिवादी एक महिला आहे, जिने स्वतःला संजय कपूर यांच्या वादग्रस्त मृत्युपत्राची एक्झिक्युटर असल्याचा दावा केलाय.

मुलांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या दिवंगत वडिलांनी त्यांना त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेचे आश्वासन दिले होते. त्यांचा दावा आहे की संजय यांनी त्यांच्या नावावर व्यवसाय सुरू केला होता. वडिलांनी आपल्याशी संबंध तोडले नव्हते, ते फिरायला न्यायचे, बिझनेससंबंधित माहिती शेअर करायचे आणि त्यांच्याशी इतरही विषयांवर बोलायचे.

संजय कपूरच्या मृत्यूनंतर, मुलांनी त्यांचे १९ जून रोजी दिल्लीत अंत्यसंस्कार केले. त्यानंतर लगेचच संपत्तीबद्दलचा तणाव वाढला, कारण प्रिया कपूरने ट्रस्टशी संबंधित कागदपत्रे आणि आर्थिक मालमत्तेवर मर्यादा आणल्या, असा आरोप केला आहे. आपल्याला सोना बीएलडब्ल्यू प्रेसिजन फोर्जिंग्ज लिमिटेडच्या (सोना कॉमस्टार) कॉर्पोरेट मीटिंग्जमध्ये बोलावण्यात आलं आणि ट्रस्ट डीड किंवा संबंधित नोंदींबाबत पारदर्शक माहिती न देता कायदेशीर कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास सांगितलं गेलं, असंही त्यांनी म्हटलंय.