Sunjay Kapur’s sister On Karisma Kapoor: उद्योगपती व अभिनेत्री करिश्मा कपूरचा एक्स पती संजय कपूरचे जून महिन्यात निधन झाले. त्यानंतर त्याच्या ३० हजार कोटींच्या संपत्तीबाबत वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

संजय कपूरच्या आईने कंपनीला एक पत्र लिहीत संजय कपूरचा मृत्यू संशयित असल्याचे म्हटले. तसेच, अनेक जण स्वत:ला वारसदार सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच प्रिया सचदेवला नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून नियुक्त करण्यासाठी तिला जबरदस्तीने कागदपत्रांवर सह्या करण्यास सांगितले आहे. तसेच कुटुंबाचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी कुणाचीही नियुक्ती केलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संजय कपूरच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी प्रिया सचदेव सोना कॉमस्टार या ऑटो कंपोनेंट मॅन्युफॅक्चरिंग फर्ममध्ये नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून नियुक्त झाली आहे. त्यानंतर तिने तिच्या नावात काही बदल केल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळाले. पूर्वी तिच्या अकाउंटवर प्रिया सचदेव कपूर, असे नाव तिने लिहिले होते; तर आता प्रिया संजय कपूर, असे लिहिल्याचे दिसत आहे.

संजय कपूरची बहीण करिश्मा कपूरबद्दल काय म्हणाली?

आता संजय कपूरच्या संपत्तीचा वाद सुरू असताना संजय कपूरची बहीण मंधीरा कपूरने करिश्मा कपूरबाबत वक्तव्य केले आहे. तिने नुकतीच ‘एनडीटीव्ही’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, “करिश्मा कपूर एक आई आहे. ती खूप चांगली आई आहे. तिचे कुटुंब एकत्र राहावे, यासाठी तिने खूप प्रयत्न केले आहेत. मुलांचे आणि संजयचे बॉण्डिंग खूप चांगले होते. त्यांचे नाते उत्तम होते. मी आशा करते की, पुढेही मुलांबरोबरचे आमचे नाते तसेच राहावे, संपूर्ण कुटुंब एकत्र असावे. कुठल्याही आईला तिच्या मुलांची काळजी असते, तिलाही तिच्या मुलांची काळजी आहे आणि ती तेच करत आहे.”

संजयच्या मृत्यूनंतर ती करिश्माच्या संपर्कात आहे का, असे विचारले. त्यावर मंधीरा म्हणाली, “मी तिच्याशी संपर्क साधला होता. मला खात्री आहे की, ती संजयची पत्नी प्रिया सचदेवच्या संपर्कातदेखील असेल. आमचे सर्वांचे एकमेकांशी उत्तम नाते आहे. मुलं त्यांच्या आजीला म्हणजे माझ्या आईला भेटण्यासाठी येतात. आम्ही सर्व जण एकमेकांच्या संपर्कात आहोत.”

ती पुढे म्हणाली, “कुटुंबाच्या प्रमुखाने तिची जागा राखावी यासाठी मार्ग शोधला पाहिजे. शेवटी आम्ही कितीही मोठे असलो तरी आपण मुले आहोत. मला वाटते की, आदर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मला, माझ्या बहिणीला किंवा माझ्या आईला शांतता हवी आहे. आम्हाला माझ्या वडिलांची स्वप्नं पूर्ण करायची आहेत आणि आम्हाला माझ्या भावाचा आदर करायचा आहे.”

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत करिश्मा कपूर व संजय कपूर यांची मुले समायरा व कियान यांच्याबद्दल ती म्हणाली, “माझ्या आई-वडिलांचे त्यांच्या नातवडांवर खूप प्रेम आहे. समायरा आणि कियान हे आमच्या कुटुंबाचा मोठा भाग आहेत. माझ्या भावाचेही त्यांच्यावर खूप प्रेम होते. ते कायमच आमच्या कुटुंबाचा भाग होते आणि पुढेही राहतील. ते घरी येतात आणि माझ्या आई-वडिलांना भेटतात.”

दरम्यान, संजय कपूर व करिश्मा कपूर यांनी २०१६ मध्ये घटस्फोट घेतला होता.