Kriti Sanon Shares Her Journey In Bollywood : बॉलीवूडमध्ये इंडस्ट्रीबाहेरील कलाकारांना अधिक संघर्ष करावा लागतो याबाबत अनेक कलाकार मुलाखतीमध्ये बोलताना दिसतात. आता लोकप्रिय अभिनेत्री कीर्ती सेनॉनंही बॉलीवूडमध्ये तिला आलेल्या अनुभवांबद्दल सांगितलं आहे.
कीर्ती सेनॉननं आतापर्यंत अनेक चित्रपटांत विविध भूमिका साकारल्या आहेत. तिला तिच्या ‘मिमी’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. परंतु, हे सगळं तिला सहज मिळालेलं नाही. अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या बॉलीवूडमधील प्रवासाबद्दल माहिती दिली आहे.
कीर्ती सेनॉनं सांगितला बॉलीवूडमधील अनुभव
कीर्ती सेनॉननं ‘सीएनएन-न्यूज १८’ला दिलेल्या मुलाखतीत इंडस्ट्रीबाहेरून आलेल्या नवोदित कलाकारांना बॉलीवूडमध्ये कराव्या लागणाऱ्या संघर्षाबद्दल सांगितलं आहे. ती म्हणाली, “तुमच्या कामाबद्दल तुमच्यामध्ये उत्सुकता असायला हवी. इथे कोणताही शॉर्टकट नसतो. काहीही सहज मिळत नाही. फुकट जेवायला मिळत नाही.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “त्यासाठी खूप मेहनत करावी लागते यादरम्यान अनेकदा तुम्हाला हरल्यासारखं वाटतं. कारण- अनेकदा विशेषकरून जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीत नवीन असतात. तुमच्या कोणीही ओळखीचं नसतं तेव्हा तुम्हाला काहीही सोप्या मार्गानं मिळणार नाही.”
इंडस्ट्रीतील लोकांबद्दल ती पुढे म्हणाली, “अनेक जण तुम्हाला तुमची स्वप्नं खूप मोठी आणि अशक्य आहेत, असं सांगतील. तुमच्या ओळखी नाहीत, तुम्ही खूप उंच आहात, बुटके आहात, जाड आहात, बारीक आहात, असं खूप काय काय सतत बोलत राहतील. लोक सतत तुम्हाला तुमच्याबद्दलच्या चुकीच्या गोष्टी सांगत राहतील. कोणीही तुम्हाला तुम्ही करू शकता, असं म्हणणार नाही.”
अभिनेत्रीनं पुढे यादरम्यान संयमी असण्याचं महत्त्व संगितलं. ती म्हणाली, “ज्यांना या क्षेत्रात टिकून राहायचं आहे, त्यांना सतत काम करत राहावं लागतं आणि संयम ठेवावा लागेल, तरच तुम्हाला यश मिळेल. जर तुमच्या मनासारख्या गोष्टी घडत नसतील, खूप वेळ लागत असेल, तर कदाचित तुम्हाला स्वत:वर काम करण्याची गरज आहे म्हणून तो वेळ असेल. योग्य वेळ आली की, गोष्टी घडतात. मी तुम्हाला हे खात्रीपूर्वक सांगू शकते; पण तुम्हाला तेवढी मेहनत घ्यावी लागेल.”