Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi fame Apara Mehta on Devdas : संजय लीला भन्साळी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठं नाव. बॉलीवूडमधील प्रत्येक कलाकाराला एकदा तरी संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळावी अशी इच्छा असते. याचं कारण म्हणजे त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा, पद्धत, चोखंदळपणा आणि त्यांच्या चित्रपटांची कथा. अशातच एका प्रसिद्ध अभिनेत्रीने संजय लीला भन्साळी यांच्या ‘देवदास’ या चित्रपटात भूमिका कशी मिळाली व त्यावेळी दोन प्रोजेक्टमध्ये एकाचवेळी काम करणं किती कठीण गेलं याबाबत सांगितलं आहे.
‘फ्रायडे टॉकिज’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री अपारा मेहता यांनी, २००० साली दिवाळीदरम्यान त्यांच्या लॅंड लाईनवर त्यांना संजय लीला भन्साळी यांचा फोन आला होता असं सांगितलं आहे. त्या म्हणाल्या, “संजय लीला भन्साळी मला फोन करून, मी संजय लीला भन्साळी बोलतोय असं म्हणाले, हे ऐकून मला आश्चर्य वाटलं. तेव्हा मी आलू टिक्की बनवत होते. ते म्हणाले, मी ‘देवदास’ नावाचा एक चित्रपट करत आहे. यातील एका भूमिकेसाठी तुम्ही योग्य आहात असं मला वाटतं, म्हणून तुम्हाला फोन केला आहे. त्यानंतर मला त्यांच्या घरी या संदर्भात भेटायला बोलावलं. मी लगेच त्यांच्या घरी गेले तेव्हा त्यांच्या आईंनी दार उघडलं आणि त्या आनंदाने मला म्हणाल्या, मीच तुझं नाव त्याला सुचवलं आहे.”
अपारा मेहता पुढे म्हणाल्या, “मीटिंग झाल्यानंतर त्यांनी मला ‘देवदास’मधील मुजरा ‘काहे छेड छेड मोहे’ च्या चित्रीकरणासाठी १२ दिवस लागतील असं सांगितलं. मी म्हणाले, मी माझ्या ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेच्या शूटिंगमधून तेवढा वेळ काढेन. पण, चित्रपटाचं शूटिंग १२ दिवसांच्या जागी पुढे १७ दिवसांचं झालं, तेव्हा मी ‘देवदास’च्या शूटिंगचे दिवसही कमी करू शकत नव्हते आणि ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’च्या सेटवरही अजून काही दिवसांची मुदत मागू शकत नव्हते. त्यामुळे मला तेव्हा सगल १७ दिवस रात्र आणि दिवस शूटिंग करावं लागलं. तेव्हा माझी अवस्था खूप वाईट झाली होती. तेव्हा मला जाणवलं की यानंतर फक्त मृत्यू आहे, इतकं काम मी करत होते. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’चं शूटिंग करून तशीच मी ‘देवदास’च्या सेटवर जायचे, तेव्हा माझे डोळेसुद्धा झोप नसल्याने खूप लाल झालेले असायचे.”
अपारा मेहता पुढे ‘देवदास’बद्दल म्हणाल्या, ‘देवदास’ हे त्यांचं ड्रीम प्रोजेक्ट होतं. वृत्तपत्रात ‘देवदास’ची जाहिरात पाहिल्यानंतर त्यांनी अशाच एका चित्रपटात काम करता यावं अशी इच्छा व्यक्त केली होती आणि नंतर योगायोगाने त्यांना या चित्रपटासाठी विचारणा झाली. त्यांनी या चित्रपटाचा सेट खूप भव्य होता व यामध्ये काम करताना त्यांना खूप मज्जा आली असंही या मुलाखतीमधून म्हटलं आहे.