मनोरंजन विश्वात संघर्ष करणाऱ्या प्रत्येकाला एका संधीची गरज असते. संघर्ष करणारा प्रत्येकजण त्या एका संधीची वाट पाहत असतो. अशीच एक संधी एका मॉडलिंग करणाऱ्या व्यक्तीला चित्रपटात काम करण्यासाठी मिळाली होती. मात्र ती पहिली संधीच त्याच्या अपयशाची कारण ठरली. चित्रपटातील केवळ एका संवादामुळे आणि अभिनयशैलीमुळे त्याचं करिअर सुरू व्हायच्या आधीच संपलं. कोण आहे हा अभिनेता?

हा अभिनेता म्हणजे दीपक मल्होत्रा. दीपक मल्होत्रा यांचं चित्रपटसृष्टीतील पदार्पण हे स्वप्नवत होतं. खुद्द यश चोप्रा यांनी त्यांना लॉन्च केलं होतं. ‘लम्हे’ या चित्रपटात त्यांनी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्याबरोबर मुख्य अभिनेता म्हणून काम केलं होतं. या चित्रपटात त्यांची भूमिका खूप कमी असली, तरी त्यांच्यासाठी ही मोठी संधी मानली गेली होती.

१९८० च्या दशकात दीपक हे भारतातील आघाडीचे मॉडेल होते. मॉडेल म्हणून ओळख मिळवल्यानंतर दीपक यांना यशराज फिल्म्सच्या ‘लम्हे’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात येण्याची संधी मिळाली. हा चित्रपट त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी होती. पण चित्रपट रिलीज होताच सर्व काहीउलटंच घडलं.

‘लम्हे’ या चित्रपटात श्रीदेवी यांनी आई आणि मुलगी अशी दुहेरी भूमिका केली होती, तर दीपक यांनी श्रीदेवीचे पती ‘सिद्धार्थ’ची भूमिका साकारली होती. ‘लम्हे’ बॉक्स ऑफिसवर फारसा चांगली कमाई करु शकला नाही. त्याचबरोबर दीपक यांचा अभिनयही प्रेक्षकांना आवडला नाही. विशेषतः जिथे ते श्रीदेवीला “पल्लो…” असे म्हणतात. तिथे त्याचा संवाद अतिशय कृत्रिम आणि भावनाविरहित वाटला.

त्यावेळी सोशल मीडियाचा जमाना नव्हता, पण दीपक यांचा ‘पल्लो’ हा संवाद प्रेक्षकांच्या टीकेचा विषय ठरला. ‘लम्हे’ नंतर दीपक यांनी राजीव मेहरा यांच्या ‘चमत्कार’मधील मुख्य भूमिका नाकारली होती, जी नंतर शाहरुख खानकडे गेली. याशिवाय ‘डर’साठी यश चोप्रा यांनी त्याचा विचार केला होता; पण ‘लम्हे’तील अनुभवामुळे ती भूमिका सनी देओल यांना दिली गेली.

श्रीदेवी आणि दीपक मल्होत्रा
श्रीदेवी आणि दीपक मल्होत्रा

एक मॉडेल म्हणून ओळख आणि लोकप्रियता मिळवल्यानंतरही केवळ ‘लम्हे’मधील अभिनयामुळे दीपक यांना पुन्हा अभिनयाची संधी मिळाली नाही. यानंतर दीपक यांनी इंडस्ट्री तर सोडलीच… पण त्यांनी भारत देशही सोडला आणि थेट अमेरिका गाठली. तिथे त्यांनी स्वत:चं दीपक हे नाव बदलून ‘डिनो मार्टेली’ ठेवलं. तिकडे त्यांनी कपड्यांचा व्यवसाय सुरू केला. सध्या ते न्यू यॉर्कमध्ये स्थायिक आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१८ मध्ये दीपक यांनी स्वतःचा अ‍ॅपेरल ब्रँड सुरू केला असून, सध्या ते त्याचे प्रमुख आहेत. त्यांनी लुबना अ‍ॅडमशी लग्न केलं असून त्यांना किआन आणि काईल आहेत ही दोन मुलं आहे. दोघांनीही वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत काही वर्षांपूर्वी मनीष मल्होत्राच्या शोसाठी मॉडेलिंग केलं आहे.