चित्रपटांमध्ये करिअर करण्यासाठी अनेक कलाकार संघर्ष करत असतात. काम मिळवण्यासाठी धडपडत असतात. मुख्य अभिनेत्री म्हणून काम करणं हे अनेक तरुणींचं स्वप्न असतं. ८० च्या दशकात देव आनंद यांच्या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पणाची संधी मिळणं ही खूप मोठी गोष्ट होती. पण एका अभिनेत्रीला सहज ही संधी मिळाली. त्यानंतर तिने फक्त सात चित्रपट केले आणि बॉलीवूड सुपरस्टारशी लग्न केलं. लग्नानंतर अवघ्या ९ वर्षांनी तिने जगाचा निरोप घेतला.

ज्या बॉलीवूड अभिनेत्रीबद्दल आम्ही बोलतोय तिचं नाव रिचा शर्मा दत्त. देव आनंद त्यांचा ‘देस परदेस’ चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी १९७८ साली न्यूयॉर्कला गेले होते. तिथे रिचा हा चित्रपट पाहण्यासाठी कुटुंबासह आली होती. इथेच रिचाला देव आनंद यांना भेटण्याची संधी मिळाली आणि तिने चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा रिचा फक्त १४ वर्षांची होती. देव आनंद यांनी तिला आधी तिचं शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला. तसेच रिचाला संपर्कात राहायला सांगितलं.

रिचा दत्तचे चित्रपट

देव आनंद यांनी नंतर रिचाला १९८५ साली ‘हम नौजवान’साठी साइन केलं. मग तिने १९८६ मध्ये ‘अनुभव’ व ‘इन्साफ की आवाज’ हे चित्रपट केले. १९८७ साली रिचाचे ‘सडक छाप’ आणि ‘आग ही आग’ हे आणखी दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते.

रिचा शर्मा व संजय दत्तची पहिली भेट

रिचा शर्मा तिची बहीण व देव आनंद यांची मुलगी अॅना आणि बंटी बहल यांच्याबरोबर सी रॉक हॉटेलमध्ये गेली होती. तेव्हा तिची व संजय दत्तची भेट झाली होती. नंतर १९८७ मध्ये रिचा शर्माने न्यूयॉर्कमध्ये संजय दत्तशी लग्न केले. लग्नानंतर वर्षभराने १९८८ साली रिचाने मुलीला जन्म दिला. त्यांच्या मुलीचं नाव त्रिशला आहे.

रिचा व संजयच्या नात्यात आला दुरावा

मुलीच्या जन्मानंतर संजय व रिचा यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि दोघेही वेगळे राहू लागले. तेव्हाच्या आघाडीच्या अभिनेत्रीबरोबर संजय दत्तची वाढती जवळीक रिचाला खटकत होती, त्यामुळे नात्यात दुरावा आला, असं म्हटलं जायचं. याचदरम्यान १० डिसेंबर १९९६ रोजी ब्रेन कॅन्सरने रिचा शर्माचं निधन झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिचाच्या निधनानंतर दोन वर्षांनी संजय दत्तने रिया पिल्लईशी लग्न केलं. पण दुसरं लग्नही फार काळ टिकलं नाही. १० वर्षांनी २००८ साली संजय व रियाचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्याच वर्षी संजयने मान्यताशी तिसरं लग्न केलं. या लग्नापासून संजयला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. मान्यता संजय दत्तपेक्षा १९ वर्षांनी लहान आहे.