प्रसिद्ध गायक लकी अली यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका केली आहे. कारण एका जुन्या कार्यक्रमातील जावेद अख्तर यांच्या व्हिडिओ क्लिपने पुन्हा एकदा सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. या व्हिडिओमध्ये जावेद अख्तर हिंदूंना उद्देशून म्हणताना दिसतात, “हिंदूंनी मुस्लिमांसारखे होऊ नये.”त्या व्हिडिओखाली लकी अली यांनी ‘एक्स’ (म्हणजेच ट्विटर) वर टिप्पणी केली “जावेद अख्तरसारखे बनू नका, तो कधीच ओरिजिनल नव्हता आणि दिसायलाही अग्ली अ‍ॅज F**k…”ही टिप्पणी काही क्षणांतच व्हायरल झाली आणि इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली.

जावेद अख्तर यांचा व्हिडीओ काय?

जावेद अख्तर यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. त्यात शोले चित्रपटातील यूं की ये कौन बोला या संवादाचा उल्लेख आहे. त्याबाबत जावेद अख्तर म्हणतात की शोले चित्रपटात एक प्रसंग होता त्यात धर्मेंद्र शंकराच्या मूर्तीच्या मागे लपून बोलत असतात. हेमा मालिनी यांना वाटतं की भगवान शंकर बोलत आहेत. मी आज असा सीन लिहू शकणार नाही. १९७५ मध्ये हिंदू नव्हते का? की तेव्हा लोक धार्मिक नव्हते का? तर होते. असं जावेद अख्तर म्हणाले होते.

पुढे जावेद अख्तर म्हणतात, मी पुण्याला राजू हिरानीसह एका मोठ्या प्रेक्षक संख्येसमोर म्हटलं होतं. मुस्लिमांसारखं बनू नका. त्यांना तुमच्यासारखं बनवा. तुम्ही मुस्लिमांसारखे होत आहात ही एक वेदना आहे. जावेद अख्तर हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी परखडपणासाठी प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियावर तिरस्कार करणाऱ्यांनाही त्यांनी तिखट उत्तरं दिली आहेत. आता लकी अलीने याच व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत जावेद अख्तर ओरिजनल माणूस नाही त्यांनी कायम कॉपी केल्याचं म्हटलं आहे. “जावेद अख्तरसारखे बनू नका, तो कधीच ओरिजिनल नव्हता आणि दिसायलाही अग्ली अ‍ॅज F**k…” असं म्हणत लकी अली यांनी जावेद अख्तर यांना उत्तर दिलं आहे. सोशल मीडियावर या कमेंटची चर्चा रंगली आहे.

Lucky Ali
गायक लकी अलीने जावेद अख्तर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. (फोटो-लकी अली इन्स्टाग्राम)

सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया

लकी अली यांनी यापूर्वीही धार्मिक विषयांवर मोकळेपणाने मत मांडले आहे. २०२३ मध्ये त्यांनी एका पोस्टमध्ये दावा केला होता की “ब्राह्मण” हा शब्द “अब्राहम” या शब्दावरून आला आहे. त्या विधानावर मोठा विरोध झाला, आणि नंतर त्यांनी ती पोस्ट हटवून हिंदू भावंडांची माफी मागितली होती. या कमेंटनंतर सोशल मीडियावर जावेद अख्तर आणि लकी अली या दोन्ही कलाकारांचे समर्थक आणि विरोधक यांच्यात वाद सुरू झाला आहे. काही जण म्हणतात की लकी अलींची भाषा अपमानास्पद आहे, तर काहींना वाटते की त्यांनी योग्य प्रतिक्रिया दिली.बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांत धार्मिक मुद्द्यांवर खुलेपणाने बोलणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धार्मिक संवेदनशीलता यातील सीमारेषा अधिकच अस्पष्ट होत चालली आहे.जावेद अख्तर आणि लकी अली या दोघांचेही मतं वेगळी असली तरी, त्यांनी भारतीय समाजातील तणावपूर्ण धार्मिक वास्तवाचे प्रतिबिंब दाखवले आहे.