Madhuri Dixit Dance Video : बॉलीवूडमध्ये असे काही सिनेमे आहेत ज्यांचे म्युझिक अल्बम विशेष लोकप्रिय ठरले; त्यापैकीच एक सिनेमा म्हणजेच १९९९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘ताल’. ऐश्वर्या राय बच्चन, अक्षय खन्ना आणि अनिल कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘ताल’ चित्रपटातील सगळी गाणी सुपरहिट ठरली. आज या सिनेमाला प्रदर्शित होऊन २६ वर्षे उलटून गेली आहेत, तरीही यामधील सगळी गाणी आजही सिनेप्रेमींना तोंडपाठ आहेत.

‘इश्क बिना’, ‘कहीं आग लगे लग जावे’, ‘रमता जोगी’, ‘नहीं सामने ये अलग बात’ ही सगळी ‘ताल’ सिनेमातील गाणी सोशल मीडियावर कायम ट्रेंडिंग असतात. अलीकडच्या तरुणाईला या गाण्यांचं विशेष आकर्षण आहे. सध्या इंटरनेटवर ‘कहीं आग लगे लग जावे’ या गाण्याचा ट्रेंड सुरू आहे. हटके हूकस्टेप्स करत सध्या नेटकरी या गाण्यावर थिरकत असल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितला सुद्धा या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरता आलेला नाहीये.

माधुरी दीक्षितने आपल्या मैत्रिणींसह या गाण्यावर खास व्हिडीओ बनवला आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘धकधक गर्ल’ने याला “थोडा ड्रामा, थोडा जलवा” असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओमध्ये माधुरीने गॉगल लावून एकदम जबरदस्त अंदाजात सोशल मीडियावरील डान्स ट्रेंड फॉलो केल्याचं पाहायला मिळत आहे.

माधुरीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “एक्स्प्रेशन क्वीन”, “चाइल्डहूड क्रश”, “मॅम सुंदर डान्स”, “माधुरी दीक्षित म्हणजेच इमोशन्स”, “एकदम मस्त”, “सुपर डान्स”, “माधुरी मॅम सुंदर एक्स्प्रेशन्स” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.

दरम्यान, माधुरी दीक्षितच्या कामाबद्दल सांगायचं झालं, ‘तेजाब’, ‘राम लखन’, ‘हम आपके हैं कौन’ अशा ९० च्या दशकातील सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने काम केलेलं आहे. बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणून तिला ओळखलं जातं. आता माधुरी लवकरच ‘मिसेस देशपांडे’ या सायकोलॉजिकल थ्रिलर सिनेमात झळकणार आहे.