Madhuri Dixit Dance Video : बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित गेल्या काही दिवसांपासून अमेरिका दौऱ्यावर आहे. याठिकाणी विविध शहरांमध्ये माधुरीच्या विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नुकताच धकधक गर्लचा ‘मिट अँड ग्रिट’ कार्यक्रम न्यूयॉर्क येथे पार पडला. यावेळी माधुरीने तिच्या सुपरहिट गाण्यांवर ठेका धरत कार्यक्रमाला उपस्थित प्रत्येकाचं मन जिंकून घेतलं.
माधुरी दीक्षितने न्यूयॉर्कमधील कार्यक्रमात सुंदर अशी नेव्ही ब्लू रंगाची ड्रेप घाघरा साडी नेसली होती. ‘धकधक गर्ल’चा हा लूक सध्या सर्वत्र चर्चेत आला आहे. स्लिव्हलेस डिझायनर ब्लाऊज, नेव्ही ब्लू रंगाची ड्रेप घाघरा साडी, गळ्यात डायमंड नेकलेस या लूकमध्ये माधुरी खूपच सुंदर दिसत होती.
माधुरी दीक्षितने या कार्यक्रमात ‘ये जवानी है दिवानी’ सिनेमातील ‘घाघरा’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला. या मूळ गाण्यात प्रेक्षकांना माधुरी अन् रणबीर कपूर यांची जोडी पाहायला मिळाली होती. हे गाणं रेखा भारद्वाज आणि विशाल ददलानी यांनी गायलं आहे. ‘ये जवानी है दिवानी’ हा सिनेमा प्रदर्शित होऊन आज १३ वर्षे उलटली आहेत तरीही माधुरीच्या ‘घाघरा’ गाण्याची जादू आजही कायम आहे.
न्यूयॉर्कमधील कार्यक्रमात माधुरीसह अभिनेता शालीन भनोतने डान्स केला. शालीन ‘मिट अँड ग्रिट’ हा शो होस्ट सुद्धा करतो. ‘देवदास’ सिनेमातील देवबाबू आणि चंद्रमुखी यांच्यामधील आयकॉनिक सीन सुद्धा या कार्यक्रमादरम्यान शालीन अन् माधुरी यांनी रिक्रिएट केल्याचं पाहायला मिळतंय.
माधुरीच्या डान्सचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिच्या फॅनपेजेसनी सुद्धा हे व्हिडीओ शेअर केले आहेत. अभिनेत्रीची कमाल एनर्जी व एक्स्प्रेशन्सचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात येत आहे. माधुरीच्या या डान्स व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
दरम्यान, माधुरीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, लवकरच ती ‘मिसेस देशपांडे’ या सीरिजमध्ये झळकणार आहे. या प्रोजेक्टची रिलीज डेट लवकरच जाहीर करण्यात येईल.
