Madhuri Dixit Dance On Shaky Song : बॉलीवूडची ग्लॅमरस, सुंदर, मराठमोळी अभिनेत्री म्हणजेच माधुरी दीक्षित. ‘धकधक गर्ल’ने काही दिवसांपूर्वीच बेबी पिंक रंगाची सुंदर साडी नेसून खास फोटोशूट केलं होतं. सुंदर साडी, त्यावर नेकलेस, केसात गुलाबाची फुलं या लूकमध्ये माधुरीचं सौंदर्य आणखी खुललं होतं. अभिनेत्रीने हे सुंदर फोटो शेअर केलेल्या माधुरी लवकरच काहीतरी खास सरप्राइज चाहत्यांना देणार अशी उत्सुकता तिच्या तमाम चाहत्यांमध्ये निर्माण झाली होती आणि अखेर प्रेक्षकांच्या लाडक्या माधुरीने ट्रेंडिग गाण्यावर ठेका धरत सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.

खरंतर, माधुरीच्या डान्स रील्सची चाहते गेल्या काही महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहत होते. गेल्या काही वर्षांपासून माधुरी आणि डान्स हे वेगळं समीकरण तयार झालेलं आहे. ‘शेकी’ गाण्याचा ट्रेंड सुरू झाल्यापासून ‘धकधक गर्ल’ या व्हायरल गाण्यावर केव्हा थिरकणार याच्या प्रतीक्षेत तिचे असंख्य चाहते होते. अखेर माधुरीने संजू राठोडच्या शेकी गाण्यावर ‘एक नंबर, तुझी कंबर’ म्हणत जबरदस्त डान्स केला आहे.

माधुरीने यापूर्वी संजूच्या ‘गुलाबी साडी’ या गाण्यावर सुद्धा डान्स केला होता. आता अभिनेत्रीला संजूच्या या नव्या गाण्याची देखील भुरळ पडली आहे. ‘शेकी’ गाणं एप्रिल २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं आणि बघता-बघता या गाण्याने रेकॉर्डब्रेक व्ह्यूज मिळवले. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी या गाण्यावर डान्स केला आहे. मात्र, जिच्या डान्स व्हिडीओची संजू राठोडसह सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते, त्या माधुरीने अखेर ‘शेकी’ ट्रेंड फॉलो करून जबरदस्त डान्स केला आहे.

माधुरीच्या डान्स व्हिडीओला अवघ्या पाच तासांत १८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावरून माधुरीची क्रेझ किती मोठ्या प्रमाणात आहे, याचा अंदाज येतो. माधुरीच्या डान्स व्हिडीओवर स्वत: संजू राठोडने खास कमेंट केली आहे.

संजू राठोड माधुरीचा डान्स पाहून म्हणतो, “Hayyee किती सुंदर” या कमेंटपुढे गायकाने लव्ह आणि भावुक झाल्याचा इमोजी देखील दिला आहे. संजूच्या कमेंटवर नेटकऱ्यांनी, “माधुरीने आधी गुलाबी साडीवर आणि आता तुझ्या शेकी गाण्यावर सुद्धा डान्स केला, तुझं नशीब उजळलं संजू दादा” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

madhuri
संजू राठोडची खास कमेंट ( Madhuri Dixit )

दरम्यान, माधुरीचा हा व्हिडीओ संजूने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर देखील शेअर केला आहे. आता ‘शेकी’ गाण्यानंतर संजूकडून चाहत्यांच्या अपेक्षा खूपच वाढल्या आहेत. त्याचं नवीन गाणं ऐकण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.