बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित ही तिच्या सदाबहार सौंदर्याने आणि अभिनयाने कायमच चर्चेत राहत असते. पण तिच्याबरोबरच तिचे पती म्हणजेच डॉ. श्रीराम नेनेदेखील चर्चेत राहत असतात. ते हृदयरोग शल्यचिकित्सक आहेत. त्यांचं स्वत:च युट्यूब चॅनेल आहे. याद्वारे ते आरोग्य व जीवनशैलीचे व्हिडीओ शेअर करत असतात. अशातच त्यांनी रोजच्या अशा सवयींबद्दल सांगितलंय, ज्यामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंतच्या लोकांच्या एकूण दिनचर्येबद्दलचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणतात, “स्नूझ (तात्पुरते बंद होऊन पुन्हा वाजणे) अलार्म वाजवल्याने तुमच्या गाढ झोपेमध्ये व्यत्यय येतो. त्यामुळे स्नूझ अलार्म लावणं बंद करा. व्यवस्थित झोपा आणि व्यवस्थित उठा.” यासाठी त्यांनी झोपेपुर्वी मोबाइल न वापरण्याचा सल्लाही दिला आहे.
यापुढे ते असं सांगतात, “मोबाईल वापरल्याने तुमच्या मेंदूतील डोपामाइनची पातळी वाढते. कारण तो तुम्हाला उत्साह आणि समाधान देतो. तसंच तणाव आणि लक्षही विचलितही करतो. तसंच कॉर्टिसॉल वाढवतो आणि याचा तुमच्या संपूर्ण दिवसावर परिणाम होतो. सकाळ-सकाळी फोनवर व्यस्त राहिल्याने एखादी ताण निर्माण करणारी माहिती मिळू शकते, ज्यामुळे दिवसभर नकारात्मकता येऊ शकते.”
यानंतर ते म्हणाले, “खूप लवकर जेवल्याने पोट भरल्यासारखे वाटत नाही. ज्यामुळे जास्त खाणे आणि अपचन होऊ शकते. जेवणानंतर तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाणदेखील वाढते. यामुळे वजन वाढू शकते. कारण मेंदूला पोट भरल्याचे जाणवण्यासाठी २०-३० मिनिटे लागतात. जेवताना नीट चावणे आणि लक्ष विचलित करणारे घटक टाळणे गरजेचं आहे.” याशिवाय डॉ. नेनेंनी हळूहळू जेवण करण्याचा सल्ला दिला आहे.
यानंतर डॉ. नेनेंनी अधिक बसणे हे ‘नवीन धूम्रपान’ असल्याचे म्हटलं. याबद्दल ते म्हणतात, “दीर्घकाळ बसून राहिल्याने रक्तप्रवाह मंदावतो. स्नायू घट्ट होतात. याचा संबंध मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या आणि अगदी कर्करोगाशीही आहे. त्यामुळे स्नायूंच्या विकारांचा धोका वाढतो.” व्हिडीओच्या शेवटी, डॉ. नेनेंनी आदल्या रात्रीच्या सवयींबद्दल सांगितले. ते म्हणाले की, “रात्री उशिरा मोबाइल वापरल्याने झोपेचा त्रास होतो. ताण येतो.”