Mahesh Bhatt बॉलिवूडचं सत्तरच्या दशकातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे परवीन बाबी ही ग्लॅमरस अभिनेत्री. परवीन बाबीने शशी कपूर, अमिताभ बच्चन यांच्यासह त्या काळातल्या जवळपास सगळ्या हिरोंसह काम केलं. दिग्दर्शक महेश भट्ट यांच्याशी तिचे प्रेमसंबंध होते. परवीन बाबीला मानसिक आजार जडला होता. दिग्दर्शक महेश भट्ट यांनीच याबाबतची माहिती दिली आहे.
महेश भट्ट त्यांची एकेकाळची प्रेयसी असलेल्या परवीनबाबत काय म्हणाले?
७० च्या दशकात परवीन बाबीची गणना टॉपच्या अभिनेत्रींमध्ये व्हायची. महेश भट्ट सांगतात, “मी तिच्याबाबत लिखाण करतो आहे. त्या लिखाणाचा अंतिम टप्पा बाकी आहे. तिच्या अखेरच्या दिवसांमध्ये ती वेडसर झाली होती. मॅडनेस असं आपण म्हणून हवं तर पण तो खूपच वाढला होता. मला वाटतं की हे सुरुवातीपासूनच होतं. पण ते समजायला बराच वेळ गेला. परवीन जेव्हा एकटी पडली तेव्हा तिने बॉलिवूड सोडून इतर काहीतरी विचार करायला हवा होता. मात्र ग्लॅमरची ही दुनिया अशी आहे जिथे परवीनच काय कुणीच पाठ फिरवू शकत नाही.” असं महेश भट्ट यांनी द हिमांशू मेहता शो च्या दरम्यान सांगितलं.
मुझे डर लगता है असं कायमच परवीन म्हणायची-महेश भट्ट
महेश भट्ट पुढे म्हणाले, परवीन अनेकदा मला सांगायची “मुझे डर लगता है.” परवीनबाबत बोलायचं झालं तर ती एकदम चांगली व्यक्ती होती. साधं राहणीमान तिला आवडत असे. परवीन जरी ग्लॅमरच्या दुनियेत वावरत होती तरीही घरात बंद दारांच्या आड ती गुजरातमधल्या जुनागढहून आलेली एक सामान्य स्त्री होती. तिला डोक्यावर तेल थापायला आणि स्वयंपाक करायला खूप आवडत असे. परवीन ज्या प्रकारे तयार व्हायची त्याला खरंच जवाब नव्हता. ग्लॅमरस अभिनेत्री कशाला म्हणतात ते तिच्याकडे बघूनच कळायचं. पण ग्लॅमरस दिसणं हा तिचा मुखवटा होता. अंतरंगात डोकावून पाहिलं तर परवीन खूप साधी भोळी स्त्री होती.

परवीनला स्क्रिझोफेनिया झाला होता
एकदा महेश भट यांनी तिचं भावनिकदृष्ट्या कोसळणं आणि मूड डिसॉर्डर याबाबतही भाष्य केलं होतं. मी तिला भावनिकदृष्ट्या कोसळताना पाहिलं आहे. मी त्या क्षणांचा साक्षीदार आहे. तुम्ही एखाद्याला असं उद्ध्वस्त होताना पाहता ही वेदनाही मोठी असते. मी सकाळी शूटिंगला जाताना तिला छान मेक अप करुन जाताना बघायचो. पण जेव्हा ती परत यायची तेव्हा ती खूप थरथरत असयाची आणि घरातला पाळीव प्राणी जसा बसतो तशी एका कोपऱ्यात जाऊन बसायची. ती कायम म्हणायची मला कुणीतरी ठार मारणार आहे. तिला स्क्रिझोफेनिया हा आजार जडला होता. अशी आठवण महेश भट्ट यांनी बीबीसी हिंदीला दिलेल्या मुलाखतीत सांगितली होती. तिच्या या आजारपणाच्या दिवसांमध्ये तिला मी आधार देण्याच्या माझ्या परिने संपूर्ण प्रयत्न केला. आमचं नातं याच सगळ्या गोष्टींमुळे तुटलं. त्यानंतर एक दिवस परवीनचा मृत्यू झाल्याचीच बातमी आली असंही महेश भट्ट यांनी सांगितलं.
वो लम्हे हा चित्रपट चर्चेत राहिला नाही पण…
महेश भट्ट आणि परवीन बाबी यांच्या नात्यावर एक चित्रपटही आला होता. ‘वो लम्हे’ असं या चित्रपटाचं नाव होतं. या चित्रपटात परवीन बाबीची भूमिका कंगनाने आणि महेश भट्ट यांची भूमिका शायनी अहुजाने साकारली होती. चित्रपट फारसा चर्चेत राहिला नाही. पण या चित्रपटात जे दाखवलं गेलं आहे त्या पात्रांची नावं जरी वेगळी असली तरीही हा चित्रपट या दोघांच्या नात्यावर आधारित होता.