Manisha Koirala opens up about surviving Serious disease : इंडस्ट्रीत अशा काही अभिनेत्री आहेत की, ज्यांनी गंभीर आजारावर मात करीत पुन्हा इंडस्ट्रीमध्ये कमबॅक केलं. अभिनेत्री सोनाली बेंद्रे, हीना खान यांसारख्या काही अभिनेत्री आहेत, ज्यांना कर्करोगासारख्या गंभीर आजाराचं निदान झाल्यानंतरही त्यांनी हार न मानता, उपचार घेत आजारावर मात केली. बॉलीवूड अभिनेत्री मनीषा कोईरालाने तिच्या कर्करोगाच्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे.
बॉलीवूडमध्ये ९० चा काळ गाजवणाऱ्या अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या आजारपणाबद्दल सांगितलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे आपल्या सहजसुंदर अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारी मनीषा कोईराला. मनीषानं आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नुकतीच तिनं लंडन येथील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं तिच्या कर्करोगाच्या प्रवासाबद्दलची माहिती दिली.
मनीषा म्हणाली, “जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की, मला कर्करोगाचं निदान झालं आहे. तेव्हा मला वाटलं की, आता सगळं संपलं. आता मी मरणार; पण देवाच्या कृपेनं असं काही झालं नाही. मी पुन्हा नव्या उमेदीनं आयुष्य जगायला सुरुवात केली”. मनीषा कोईरालाला २०१२ साली गर्भाशयाचा कर्करोग झाला होता.
मनीषा कोईरालाला नुकतीच ब्रॅडफोर्ड विद्यापीठानं डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. तिच्यासाठी हा तिच्या जीवनप्रवासातील एक अभिमानाचा क्षण आहे. अभिनेत्री त्याबाबत म्हणाली, “जीवनाचे खरे धडे मी पुस्तकांमधून नव्हे, तर अनुभवांतून शिकले आहे”. तिनं स्वतःला ‘स्टुडंट ऑफ लाइफ’ असंही म्हटलं आहे. मनीषानं नुकताच या संदर्भात एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये ती पदवीदान समारंभाला उपस्थित असल्याचं पाहायला मिळालेलं.
मनीषानं ९० च्या काळात बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिनं आजवर ‘अनमोल’, ‘अकेले हम अकेले तूम’, ‘मिलन’, ‘खामोशी’, ‘सनम’, ‘लोहा’, ‘युगपुरुष’, ‘तालिबान’, ‘ग्रहण’, ‘लेडी टायगर’, ‘भूत’, ‘आय एम’, ‘संजू’, ‘डिअर माया’ यांसारख्या चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
मनीषा कोईरालाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती शेवटची लोकप्रिय दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ या वेब सीरिजमध्ये झळकलेली. त्यामध्ये तिनं महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्यातील तिच्या भूमिकेचं अनेकांनी कौतुकही केलं होतं. त्यामुळे त्यानंतर आता ती कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार हे पाहणं रंजक ठरेल.