Manisha Koirala Doctorate Degree : ९० च्या दशकातील या लोकप्रिय अभिनेत्रीने एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारत प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.
सौंदर्य आणि चित्रपट यांमुळे ही अभिनेत्री कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते. ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री ते आजही विविध धाटणीच्या भूमिका साकारणारी अभिनेत्री मनीषा कोईरालाची ओळख आहे.
प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री मनीषा कोईरालाला नुकतीच ब्रॅडफोर्ड विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. तिच्यासाठी हा तिच्या जीवनप्रवासातील एक अभिमानाचा क्षण आहे.
‘दिल से…’ चित्रपटातील तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी मनीषा म्हणाली की, ती जीवनाचे खरे धडे पुस्तकांमधून नव्हे, तर अनुभवांतून शिकली आहे. तिने स्वतःला ‘स्टुडंट ऑफ लाइफ’ म्हटले आहे.
अलीकडेच, मनीषा कोईरालाने तिच्या इन्स्टाग्रामवर या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त करणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पदवीदान समारंभाला उपस्थित राहताना दिसत आहे. व्हिडीओबरोबर तिने लिहिलेय, “आज मला ब्रॅडफोर्ड विद्यापीठाकडून ऑनररी डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. मी आज येथे पारंपरिक शिक्षणाच्या मार्गाने नाही, तर जीवनातील अनुभव, कठोर परिश्रम, अपयश व सेवेतून मिळालेल्या शिकण्याबरोबर उभी आहे.”
यावेळी तिने ब्रॅडफोर्ड विद्यापीठाचे आभारही मानले. तिने लिहिलेय, “ही माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे आणि त्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. यावरून दिसून येते की, तुम्ही कशीही सुरुवात केली तरी प्रवास महत्त्वाचा असतो. माझ्या कथेचे महत्त्व समजून घेतल्याबद्दल ब्रॅडफोर्ड विद्यापीठाचे आभार. पुढे जात राहा. चमकत राहा.” आता अभिनेत्रीच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे.
याबरोबरच अभिनेत्री मनीषा कोईराला सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चाहत्यांच्या संपर्कात असते. तिच्या खासगी, तसेच व्यावसायिक आयुष्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत माहिती देत असते.
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, मनीषा अलीकडेच संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी : द डायमंड बाजार’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती. त्यातील तिच्या कामाचे खूप कौतुक झाले. मनीषाचे नाव बॉलीवूडमधील अनुभवी अभिनेत्रींमध्ये गणले जाते. तिने ‘दिल से’, ‘बॉम्बे’, ‘हे राम’ यांसारख्या काही उत्तम चित्रपटांमधूनही काम केले आहे, ज्यामुळे तिला एक वेगळी ओळख मिळाली.