Manoj Bajpayee Talks About Anurag Kashyap : मनोज बाजपेयी बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. सध्या ते त्यांच्या ‘झेंडे’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. यापूर्वी त्यांनी अनेक हिट चित्रपटांत व वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. पण, आजही अनेक जण त्यांना ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या अनुराग कश्यप दिग्दर्शित चित्रपटासाठी ओळखतात. अशातच आता मनोज यांनीही त्यांचा मित्र व सहकलाकार अनुरागबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

अनुराग कश्यप व मनोज बाजपेयी यांनी राम गोपाळ वर्मा यांच्या १९९८ साली आलेल्या क्राइम ड्रामा ‘सत्य’मध्ये काम केलेलं. त्यानंतर दोघांनी राम गोपाळ वर्मा यांच्याच अजून एका चित्रपटात काम केलेलं. दोन चित्रपटांत मनोज बाजपेयींबरोबर काम केल्यानंतर अनुरागने त्यांची ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटासाठी निवड केलेली. २०१२ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्याकाळी हिट ठरला होता. अनुराग व मनोज यांच्यामध्ये या चित्रपटापूर्वी काही गैरसमज असल्याचं मनोज यांनी सांगितलेलं. आता त्यांनी अनुरागबद्दल नुकतीच एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज बाजपेयींची अनुराग कश्यपबद्दल प्रतिक्रिया

‘बॉलीवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत मनोज बाजपेयी अनुराग कश्यपच्या रागाबद्दल म्हणाले, “आज अनुराग स्वबळावर उभा आहे, पण त्याने या प्रवासात अनेक शत्रू बनवले. त्याने रागात कधी काचेचा ग्लास फोडला,तर एकदा त्याने रागात स्वतःच्या हातालाही दुखापत करून घेतली. तो अनेकदा आजारी पडलाय, पण तरीही त्याची भूमिका आजही ठाम आहे. इतर चित्रपट निर्मात्यांसाठी तो एक उत्तम उदाहारण ठरू शकतो.”

मनोज पुढे म्हणाले, “कामाच्या बाबतीत मी त्याच्यापेक्षा अधिक व्यवहारिक आहे. तोही व्यवहारिक आहे, पण काही वेळा त्याचं त्याच्या रागावर नियंत्रण राहात नाही. ज्या दिवशी त्याने ट्रोलिंगवर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली तेव्हाच मला जाणवलेलं की, त्याने स्वत:वरचं नियंत्रण गमावलं आहे.”

मनोज यांनी ट्रोलिंगबद्दल पुढे सांगितलं की, “ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करा, ते निर्थक आहे. तुम्हाला समजायला हवं की, काम शोधण्यापेक्षा आणि काम करण्यापेक्षा इतर कोणतीही गोष्ट महत्त्वाची नाहीये. ट्रोल करणाऱ्यांना कोणाबद्दलही आदर नसतो. त्यांना कदाचित त्यांच्या स्वत:च्या भावाप्रती, बहिणीप्रती आणि आई-वडिलांप्रतीही आदर नसेल. त्यांच्याकडे दुसरं कुठलं कामंच नसेल. त्यांना फक्त ज्या लोकांनी खूप यश मिळवलं आहे, त्यांच्यातील दोष, अवगुण काढायचे असतात.”

अनुरागबद्दल मनोज बाजपेयी पुढे म्हणाले, “अनुरागने इथपर्यंत येण्यासाठी खूप त्याग केला असणार.” गेल्या वर्षी ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत, मनोज बाजपेयी यांनी अनुराग व त्यांच्यामध्ये निर्माण झालेल्या गैरसमजाबद्दल सांगितलेलं. ते म्हणालेले, “आमच्यामध्ये एका गोष्टीवरून गैरसमज निर्माण झालेला आणि आम्ही त्याबद्दल बोलत नाही, पण त्यावेळी याबद्दल विनाकारण खूप चर्चा करण्यात आलेली.”

मनोज बाजपेयी व अनुराग कश्यप यांच्यामध्ये निर्माण झालेला गैरसमज

मनोज बाजपेयी याबद्दल म्हणालेले, “त्याने माझ्यासाठी मी काम करतो तसे चित्रपट बनवणं थांबवलं आहे असं मला वाटलेलं आणि त्यालाही मनोज बाजपेयीची आता काही गरज नाही, कारण त्याचं करिअर संपत चालंल आहे असं वाटलेलं. त्यामुळे आम्ही वैयक्तिकरित्या आमचं आमचं आयुष्य जगत होतो. त्याला माझी गरज नव्हती, मलाही त्याची गरज नव्हती.” त्यांनी पुढे सांगितलं की, एकमेकांबरोबर अनेक वर्ष न बोलल्यानंतर त्यांच्यातील हा वाद तेव्हा मिटला, जेव्हा ‘गँग्स ऑफ वासेपूर’च्या पहिल्या भागासाठी अनुरागने मनोज बाजपेयींना विचारलेलं.