Adinath Kothare Role in Ramayana Movie : ‘रामायण’ हा चित्रपट सिनेविश्वात सध्या प्रचंड चर्चेत आहे. नमित मल्होत्रा निर्मित आणि नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामाची भूमिका साकारत असून, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. यश रावणाच्या भूमिकेत आहे, तर सनी देओल हनुमानाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.

याशिवाय मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे या चित्रपटात ‘भरत’ ही भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपासून या चित्रपटातील त्याच्या भूमिकेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. अशातच आता स्वत: आदिनाथने एका मुलाखतीत या चित्रपटाबद्दल आणि चित्रपटातील भूमिकेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत आदिनाथने यात भूमिका करायला मिळणं आशीर्वाद असल्याचं म्हटलं.

अभिनेता म्हणाला, “भारतात बनणाऱ्या सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी ‘रामायण’ हा एक चित्रपट आहे. एवढंच नाही तर आज जागतिक पातळीवरही हा चित्रपट त्याच्या भव्यतेसाठी ओळखला जात आहे. या चित्रपटाचा भाग होणं ही माझ्यासाठी एक मोठी जबाबदारी आहे. या भूमिकेसाठी माझी निवड करणाऱ्या मुकेश छाब्रा तसंच नितेश तिवारी सरांचे मी आभार मानतो.”

यानंतर ते म्हणाले, “याशिवाय निर्माते नमित मल्होत्रा यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, त्यासाठी मी त्यांचाही ऋणी आहे.” यानंतर आदिनाथने चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल सांगितलं की, “नितेश तिवारी आणि नमित मल्होत्रा हे दोघेही दूरदृष्टी असलेले व्यक्ती आहेत. या चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शनवर जवळपास १० वर्षे त्यांनी मेहनत घेतली गेली आहे. शिवाय संहितेचं कामही २०१६-२०१७ पासून सुरू होतं.”

आदिनाथ कोठारे इन्स्टाग्राम पोस्ट

यानंतर आदिनाथ म्हणतो, “जेव्हा मी या चित्रपटाची पटकथा ऐकली, तेव्हा मी थक्कच झालो. त्यानंतर आता त्यावर सर्वांचं दमदार सादरीकरण, व्हीएफएक्स आणि उत्तम निर्मिती… हे सगळं अतिशय दर्जेदार असणार आहे. खरं सांगायचं तर, मी आजवर वाचलेली ही सर्वोत्कृष्ट संहिता आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काही दिवसांपुर्वीच ‘रामायण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. चित्रपटाचा हा टीझर प्रेक्षकांना फार आवडला असून अनेकांनी याबद्दल उत्सुकता व्यक्त केली. ‘रामायण’ हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे. पहिला भाग २०२६ मध्ये, तर दुसरा भाग २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे.