Bajirao Mastani : संजय लीला भन्साळी यांच्या आयकॉनिक ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाने सिनेप्रेमींच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. रणवीर सिंह, दीपिका पादुकोण आणि प्रियांका चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘बाजीराव मस्तानी’ २०१५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात वैभव मांगले, सुखदा खांडकेकर, महेश मांजरेकर, अनुजा साठे अशा बऱ्याच कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. या कलाकारांसह आणखी एक मराठी अभिनेत्री ‘बाजीराव मस्तानी’मध्ये झळकली होती. तिच्याबद्दल जाणून घेऊयात…
‘आभाळमाया’ या सदाबहार मालिकेतील चिंगी म्हणजेच लोकप्रिय अभिनेत्री स्वरांगी मराठेने ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमात दीपिकाची सखी असलेल्या झुमरीची भूमिका साकारली होती. नुकत्याच ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत स्वरांगीने संजय लीला भन्साळी यांच्यासह काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
स्वरांगी सांगते, “या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी जेव्हा मला फोन आला, तेव्हा मी अशी सक्रियरित्या काम करत नव्हते. माझे फक्त गाण्याचे कार्यक्रम सुरू होते. मग मला असं जाणवलं की, एवढा फोन आला आपल्याबरोबर प्रँक तर होत नाहीये ना…त्यानंतर जरा मी चौकशी केली की, माझा नंबर तुम्हाला कुठून मिळाला वगैरे…कारण, संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात काम करणं ही मोठी गोष्ट होती. माझी जेव्हा खात्री पटली तेव्हा घरचे मागे लागले की, काहीही करून तू ही ऑडिशन दे…थोडं मनावर घे.”
प्रत्यक्ष ऑडिशन दिल्यावर दोन महिन्यांनी…
“मी त्यांना घरून ऑडिशनचा व्हिडीओ करून पाठवला होता. मला वाटलेलं की माझी भूमिका महाराष्ट्रीयन असेल पण, दीपिकाच्या म्हणजेच चित्रपटात मस्तानीच्या सखीच्या भूमिकेसाठी मला विचारणा झाली होती. प्रत्यक्ष ऑडिशन दिल्यावर सुद्धा मला काहीही अपेक्षा नव्हत्या. पण, त्यानंतर दोन महिन्यांनी मला फोन आला की, तुमची निवड झालीये आणि संजय सरांना तुम्ही भेटायला या. सरांना जेव्हा मी भेटले तेव्हा त्यांनी मला विचारलं होतं की, ‘भूमिका खूपच लहान आहे तर तू नक्की करशील ना?’ कारण, मी याआधी मराठी इंडस्ट्री काम केलेलं आहे हे त्यांना माहिती होतं. अर्थात भन्साळींच्या चित्रपटात काम करायचं असल्याने मी लगेच होकार दिला.” असं अभिनेत्रीने सांगितलं.
…अन् संजय सर चिडले
सेटवर एके दिवशी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी स्वरांगीला ओरडले होते हा किस्सा सांगताना अभिनेत्री म्हणते, “बाजीराव मस्तानीच्या सेटवर सगळे शिस्तबद्ध पद्धतीने वागायचे…त्यामुळे मला थोडं कामाचं दडपण सुद्धा आलं होतं. मी खूप रडायचे. माझ्याकडून होणारच नाही असं वाटायचं पण, मला आलेल्या दडपणातूनच पुढे खूप चांगलं काम होत गेलं. एकदा असं झालेलं की, रात्री शूटिंग सुरू झालं… माझे दोन-तीन टेक एकदम ओके गेले. सरांनी आणि टीमने टाळ्या वाजवल्या होत्या. पण, त्यानंतर अचानक माझे रिटेक सुरू झाले. त्यानंतर सर चिडले…कारण, रात्रीचं शूटिंग होतं…सतत रिटेक घेतल्याने बऱ्यापैकी उजाडलं होतं आणि पॅकअप झालं. तो रिटेक माझ्या कायम लक्षात राहील. केसातील पिनपासून, ओढणी कशी लावलीये एवढ्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे त्यांचं बारीक लक्ष असायचं. या सगळ्या गोष्टी सरांकडून शिकण्यासारख्या होत्या. कारण, त्यांच्याकडे खरंच खूप परफेक्शन आहे.”