Mika Singh Regrets Production : बॉलीवूड संगीतविश्वातील एक लोकप्रिय नाव म्हणजे मिका सिंग. त्याच्या ‘मौजा ही मौजा’, ‘गंदी बात’, ‘जुम्मे की रात’ यांसारख्या अनेक सुपरहीट गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावलं आहे. गायन आणि मनोरंजन क्षेत्रात विविध प्रयोग करणारे मिका सिंगने निर्माता म्हणूनही काम केलं आहे.
मिका सिंगने ‘डेंजरस’ या वेबसीरिजच्या निमित्ताने निर्माता म्हणून जबाबदारी निभावली. या सीरिजमध्ये बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हर हे मुख्य कलाकार होते. पण बिपाशा आणि करण सिंग ग्रोव्हरची सीरिजची निर्मिती करणं ही आयुष्यातील ‘सर्वात मोठी चूक’ असल्याचं त्याने म्हटलंय.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, एका मुलाखतीत मिका आपल्या या निर्मितीबद्दल म्हणाला, “बॉलीवूडमध्ये ज्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांनी संपत्ती (प्रॉपर्टी) मध्ये गुंतवणूक करावी. अन्यथा, निर्माता होऊन स्वतःचं नुकसान करून घ्याल. मी माझ्या आवडत्या बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हरबरोबर १४ कोटींचा सिनेमा तयार केला. पण मी जर हा चित्रपट केला नसता, तर नवीन रोल्स रॉयस कार विकत घेतली असती. निर्मितीत पैसे जाळण्यापेक्षा तेच बरं झाले असते. त्यामुळे मी आता कुठेही पैसे गुंतवतो, तर ते फक्त प्रॉपर्टी किंवा कारमध्ये… नाहीतर मूर्ख बनावं लागतं.”
त्याने पुढे सांगितले की, “निर्माता म्हणून मी चांगला सिनेमा केला होता आणि मोठ्या कलाकारांबरोबर काम केलं. बिपाशा बासू हे मोठं नाव आहे. एक नवखा निर्माता असूनही मी एवढे मोठे स्टार्स साइन केले, याचा अर्थ मी चांगला निर्माता आहे. आम्ही लंडनमध्ये ५० दिवस शुटिंग केलं. भूषण पटेल (ज्यांनी ‘अलोन’ दिग्दर्शित केला होता) हेही दिग्दर्शनात सहभागी होते. ‘अलोन’ला पाच वर्षे झाली होती, म्हणून मला वाटलं की करण सिंग ग्रोव्हर तयार झाला तर उत्तम. तो चांगला दिसतो आणि त्याचा ‘हेट स्टोरी ३’ हिट झाला होता. पण या प्रोजेक्टमध्ये बिपाशा नक्की कशी आली आणि त्यांच्या दोघांचं नातं काय होतं, ते मला समजलं नाही. पण यामुळे मला खूप नुकसान सहन करावं लागलं.”
बिपाशा बासू इन्स्टाग्राम पोस्ट
मिकाने हेही उघड केलं की, बऱ्याच मोठ्या कलाकारांनी त्याला सिनेमा तयार करू नकोस असं सांगितलं होतं. याबद्दल तो म्हणाला, “,माझा बिपाशा किंवा करणवर राग नाही. राग आहे; तो स्वतःवर. मी खूप मोठा धोका पत्करला. अक्षय कुमारने मला सल्ला दिला होता की, सिनेमा बनवू नकोस. सलमान खाननेही सांगितलं होतं की, जर सिनेमा करायचाच असेल, तर स्वतःच अभिनय कर. तो म्हणाला होता, ‘सिनेमा चालला किंवा नाही चालला, तरी त्यात तू असशील. नाहीतर दुसऱ्याच्या अपयशावर रडावं लागेल.’ त्यामुळे आता माझ्या पुढच्या प्रॉजेक्टमध्ये मी स्वतः अभिनय करतोय आणि यापुढे ती चूक पुन्हा करणार नाही.”
‘डेंजरस’ ही सीरिज शेवटी MX Player वर एक मिनी वेब सीरिज म्हणून रिलीज झाली. या सीरिजमधून बिपाशा बासूने डिजिटल विश्वात पदार्पण केलं होतं आणि तिच्याबरोबर करण सिंग ग्रोव्हरही होता. या सीरिजची कथा विक्रम भट्ट यांनी लिहिली होती आणि दिग्दर्शन भूषण पटेल यांचं होतं.