सेलिब्रिटी म्हटलं की चाहत्यांनी सेल्फीसाठी गर्दी करणं, एक झलक पाहता यावी यासाठी घराबाहेर जमणं या गोष्टी आल्याच. पण एका बॉलीवूड अभिनेत्याच्या बाबतीत अनोखा किस्सा घडला होता. कारण या अभिनेत्याची चाहती चक्क त्याच्या घरात मोलकरीण म्हणून राहिली. खास गोष्ट अशी की ही चाहती एका मंत्र्याची मुलगी होती.
१९९० च्या दशकात गोविंदा आघाडीचा स्टार होता. त्याच्या रोमँटिक कॉमेडी चित्रपटांचा मोठा चाहता वर्ग होता. त्या काळात गोविंदाची महिला चाहत्यांमध्ये इतकी क्रेझ होती की त्या त्याच्या घराबाहेर आणि चित्रपटाच्या सेटबाहेर जमायच्या. काही जणी तर त्याला सेटवर पाहून बेशुद्ध व्हायच्या, असं गोविंदाच्या पत्नीने सांगितलं होतं. सुनीता आहुजाने गोविंदाच्या अशाच एका चाहतीचा किस्सा शेअर केला होता.
गोविंदाची खूप मोठी चाहती असलेली एक तरुणी मोलकरीण म्हणून त्यांच्या घरात राहिली होती. इतकंच नाही तर तिने मोलकरीण म्हणून २० दिवस त्यांच्या घरात काम केलं होतं. ती चाहती एका मंत्र्याची मुलगी होती, असं सुनीताने टाइमआउट विथ अंकित पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं.
मोलकरीण म्हणून आली, पण काम यायचं नाही
“गोविंदाची चाहती होती, तिने मोलकरीण असल्याचं नाटक केलं होतं. ती जवळपास २०-२२ दिवस आमच्याबरोबर घरात राहिली. ती एखाद्या गरीब कुटुंबातील आहे असा दिखावा करायची. पण तिला काम यायचं नाही. मी माझ्या सासूबाईंना म्हटलं की तिला भांडी कशी घासावी किंवा घर कसे साफ करावे हे माहीत नाही. नंतर आम्हाला कळालं की ती कोणत्यातरी मंत्र्याची मुलगी आणि गोविंदाची चाहती आहे,” असं सुनीता आहुजा म्हणाली होती.

रात्री उशिरापर्यंत जागायची आणि….
“मी त्यावेळी खूप लहान होते पण मला तिच्यावर संशय आला. ती रात्री उशिरापर्यंत जागी असायची आणि गोविंदाची वाट पाहत असायची. मी हे सगळं बघत होते, नंतर ती कोण आहे याबाबत मी तिला विचारलं. तिने रडत कबुली दिली की गोविंदाची चाहती आहे. मग तिचे वडील तिला घ्यायला आले, त्यांच्योबरोबर इतर चार गाड्या होत्या. ती जवळपास २० दिवस आमच्या घरी राहिली. असे गोविंदाचे चाहते होते,” असं सुनीता आहुजाने सांगितलं होतं.
गोविंदा मागील काही काळापासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गोविंदा व त्याची पत्नी सुनीता यांच्यात बिनसल्याचं दिसतंय. सुनीता मुलाखतीत गोविंदा एकटाच राहतो, त्याच्या अफेअरच्या चर्चा होत आहेत, असं म्हणताना दिसतेय. गोविंदा व सुनीत यांनी १९८७ मध्ये लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला ३८ वर्षे झाली आहेत.
