Mithun Chakraborty Talks About Bollywood Parties & Award Functions : मिथुन चक्रवर्ती हे ९० च्या काळातील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी त्यांच्या अभिनयामुळे त्या काळी अनेकांना भुरळ पडली होती. त्यांचे चाहते आजही त्यांचे चित्रपट, त्यामधील गाणी बघताना व ऐकताना दिसतात. मिथुन चक्रवर्ती यांचं नाव बॉलीवूडमधील दिग्गज व्यक्तींच्या यादीत घेतलं जातं. अशातच आता त्यांनी नुकतच बॉलीवूडमध्ये होणाऱ्या पार्ट्यांबद्दल वक्तव्य केलं आहे.
मिथुन चक्रवर्ती आजही अभिनय क्षेत्रात सक्रिय असून, लवकरच ते काही बहुप्रतीक्षित चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकतीच त्यांनी ‘आयएएनएस’ला मुलाखत दिली असून, त्यामध्ये त्यांनी बॉलीवूडमधील पार्ट्यांबद्दल सांगितलं आहे. त्यामध्ये त्यांनी ते अशा पार्टीला जात नसून, त्यामागचं कारणही सांगितलं आहे.
मिथुन चक्रवर्तींची बॉलीवूडमधील पार्ट्यांबद्दल प्रतिक्रिया
मिथुन चक्रवर्ती म्हणाले, “मी सुरुवातीपासूनच पार्टीला जात नाही, पुरस्कार सोहळ्यांनाही जात नाही. पार्टीमध्ये काय असतं? गप्पा, गॉसिप, मी दारू पीत नाही. मी दारू पिणं बंद केलं आहे. त्यामुळे अशा पार्टीला जाऊन मी काय करू आणि इतर वेळीसुद्धा मला माझ्या कुटुंबाबरोबर राहायला खूप आवडतं. मी माझ्या कुटुबीयांसह झाडांची काळजी घेण्यात, माझ्या पाळीव प्राण्यांबरोबर वेळ घालवतो. मला जेवण बनवण्याची आवड आहे. त्यामुळे ते मी करत असतो”.
मिथुन ८०-९०च्या काळात एका वेळी ६५ सिनेमे एकत्र करत होते. त्याबद्दल त्यांनी नुकतंच सांगितलं आहे. ते म्हणाले, “तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, मी एका वेळेला ६५ चित्रपट एकत्र करीत होतो. एकाच वर्षात १९ चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे माझ्या नावाचा ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये समावेश आहे. त्यामुळे कामाचा ताण किती असतो याची कल्पना तुम्हाला येईल. मी ३८० चित्रपट केले आहेत.”
अभिनेते पुढे म्हणाले, “आता मी फक्त अशाच चित्रपटांत काम करतो, ज्यामधून मला चांगले पैसे मिळतात. मी प्रभासबरोबर ‘फौजी’ चित्रपट करीत आहे. तो देशभक्तीवर आधारित चित्रपट आहे. त्यानंतर ‘जेलर २’मध्ये मी रजनीकांतबरोबर काम करीत आहे. हाही वेगळा चित्रपट आहे. त्यासह मी ‘प्रजापती २’ हा चित्रपटही करतोय. माझ्यासाठी या चित्रपटांत काम करणं सोपं आहे.”