Mithun Chakraborty’s Son Talk’s About Debut Films Failure Says Father Helped Him During Tough Time : आपल्या अभिनयाने ९० चा काळ गाजवणारे लोकप्रिय बॉलीवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयशैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. अशातच आता त्यांची दोन्ही मुलं मिमोह चक्रवर्ती व निमांश चक्रवर्तीसुद्धा या क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांचा मुलगा मिमोह यानं नुकतंच त्याच्या पदार्पणातील चित्रपटाच्या अपयशाबद्दल सांगितलं आहे.

मिमोह चक्रवर्ती हा मिथुन यांचा मुलगा असून, त्यानं वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यानं ‘जिमी’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. परंतु, त्याच्या या चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्यानं त्यानं याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मिमोहनं ‘स्क्रीन’शी संवाद साधताना याबाबत सांगितलं आहे.

पदार्पणातील चित्रपटाबद्दल मिमोह चक्रवर्तीची प्रतिक्रिया

मिमोह म्हणाला, “जेव्हा तुमचा वाईट काळ सुरू असतो आणि तुम्ही खूप खचून जाता तेव्हा त्यातून बाहेर येणं हाच एकमेव मार्ग तुमच्यासमोर असतो. त्यामुळे मला मिळालेल्या अपयशाबाबत मी धन्यवाद म्हणतो. ‘जिमी’नंतर मला खऱ्या अर्थानं समजलं की, कठीण प्रसंगातून बाहेर कसं यायचं असतं. जर तुम्हाला सगळंच मिळालं, तर त्याची किंमत राहत नाही. त्यामुळे कठीण प्रसंग, अपयश गरजेचे असतात; पण त्यामुळे तुम्ही त्यात अडकता कामा नये. ‘जिमी’नं मला कुठल्याच गोष्टीला गृहीत धरू नये हे शिकवलं.”

‘जिमी’बद्दल मिमोह पुढे म्हणाला, “मला इतका वेगळा अनुभव येईल हे अपेक्षित नव्हतं. मी स्वत:ला हेच सांगत होतो की, काही जणांना मी आवडू शकतो; काहींना नाही. पण जे झालं, ते फार अनपेक्षित होतं. माझ्यावर जी टीका झाली, मला कळायचंच नाही की ते का होत आहे. कारण- माझ्या मते तरी चित्रपट इतकाही वाईट नव्हता. पण, आज जेव्हा मी त्या सर्व गोष्टींचा विचार करतो तेव्हा मला त्याचा काहीच फरक पडत नाही. त्यावेळी माझ्यासाठी हे सर्व तितकं सोपं नसतं. सर्वत्र याबाबत नकारात्मक प्रतिक्रिया होत्या. त्यामुळे माझा संताप झालेला.”

पुढे मिमोह कुटुंबीयांच्या प्रतिक्रियांबद्दल म्हणाला, “माझ्या पालकांनी मला यादरम्यान खूप पाठिंबा दिला. मी अभिनेता नंतर आधी त्यांचा मुलगा आहे. आज मी जे काही आहे ते त्यांच्यामुळेच. माझी भावंडं माझे खूप चांगले मित्र आहेत आणि आमच्या घरी खूप छान, सकारात्मक वातावरण असतं. त्यामुळे मला एकदाही असं जाणवलं नाही की, ते माझ्यामुळे नाराज आहेत वगैरे. याउलट त्यांनी मला खूप पाठिंबा दिला. मी वर्षभर घराबाहेर पडलो नव्हतो आणि त्यांनी त्यादरम्यान मला माझी स्पेस दिली. ‘जिमी’नंतर मी लाइमलाईटपासून लांब होतो. मला ते नको होतं. मला स्वत:कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा होता. मी स्वत:ला खूप दोष द्यायचो. आई-वडील व भावंडांनी मला यातून बाहेर येण्यासाठी मदत केली. तेव्हा मी फक्त २५ वर्षांचा होतो. मी माझा वेळ घेतला. प्रत्येक जण यातून जात असतो; पण याबाबत बोललं जात नाही”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे मिमोहनं अनेकांनी ‘हाँडेटेड थ्रीडी’ चित्रपटातून त्याला काढून टाकण्याबाबत दिग्दर्शकाला सांगितलं असल्याचं म्हटलं आहे. अभिनेता म्हणाला, “त्या एक वर्षानंतर मी माझा पोर्टफोलिओ बनवला आणि अनेक दिग्दर्शक व निर्मात्यांना भेटलो. ते सर्व जण चांगले होते. मी विचार करीत होतो की, प्रत्येक जण मला काम देऊ शकत नाही; पण मी ‘हाँटेट’ चित्रपटासाठी स्वत: विचारलं होतं. तेव्हा विक्रम भट्ट यांना चित्रपटात मला काम न देण्याबाबत सांगण्यात आलेलं. माझ्याबद्दल इंडस्ट्रीमध्ये असं काहीसं मत निर्माण झालेलं. जर माझ्या नावानं चित्रपट चालणार नसेल, तर कोणीही माझ्याबरोबर का काम करेल. पण, तेव्हा हे मला कळत नव्हतं.”