दिग्गज गायक मोहम्मद रफी यांनी त्यांच्या करिअरमध्ये कधीही कुणाकडे काम मागितले नाही. लता मंगेशकर व आशा भोसले या दोन्ही बहिणींनी मत्सर व असुरक्षिततेतून रफी यांच्या करिअरला धक्का पोहोचवला, असा आरोप मोहम्मद रफी यांचे चिरंजीव शाहिद रफी यांनी केला आहे. तसेच मोहम्मद रफी व किशोर कुमार यांच्यातील व्यावसायिक इर्ष्या होती, या अफवा त्यांनी फेटाळून लावल्या.

विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत शाहिद म्हणाले की, मंगेशकर बहिणींनी वडिलांच्या कारकिर्दीला आणि प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. रफी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स जिंकणार होते, तेव्हाही लता मंगेशकर यांनी हस्तक्षेप केला होता, असं शाहिद रफी म्हणाले.

“रफी साहेब त्यांच्यापेक्षा वरचढ आहेत, याचा त्यांना हेवा वाटत होता. त्यांना वाटत होतं की त्यांच्या पुढे कोणी नसावं. लोक रफी साहेबांना नंबर वन म्हणत होते आणि त्यांना ते आवडलं नाही. ते नऊ वर्षे घरी निराश बसून होते. १९७० च्या दशकात त्यांनी गायलेलं कोणतंही गाणं तुम्ही ऐका,” अशी विनंती शाहिद यांनी केली. रफी यांनी नऊ वर्षे न गाण्याचा निर्णय स्वतः घेतला होता, कारण गाणी म्हणून पाप केल्याचं एका मौलवीने त्यांना म्हटलं होतं. काही वर्षांनी रफी पुन्हा इंडस्ट्रीत आले होते.

लता मंगेशकर असुरक्षित होत्या- शाहिद रफी

रफींच्या गायकीतील चढ-उतारांची प्रत (रेंज) नव्हती, असं आशा भोसले म्हणाल्याचा थेट आरोप शाहिद यांनी केला. “हे मी त्यांच्या तोंडावरही बोलू शकतो. मी लताजींना त्यांच्या निधनाआधीच हे म्हटलं होतं. लताजींनी दावा केला होता की माझ्या वडिलांच्या कारकीर्दीला उतरती कळा लागल्याने त्यांनी लताजींना म्हटलं की माफ करावं. पण त्यांनी असं कधीच म्हटलं नाही. दोन जण माझ्या वडिलांकडे आले होते आणि लताजींना माफ करा असं म्हणाले होते. नव्या गायिका इंडस्ट्रीत येत होते, ज्यात लताजींची बहीणही होती. आणि करिअरबद्दल त्यांना असुरक्षित वाटत होतं. मला सांगा अशा परिस्थितीत कारकीर्दीला उतरती कळा लागण्याचा धोका कोणाला होता?” असा सवाल शाहिद रफी यांनी केला.

वडिलांबद्दल वाईट बोललेलं सहन करणार नाही – शाहिद रफी

१९६० च्या दशकात मोहम्मद रफी संगीतविश्वात यशाच्या शिखरावर होते, असं शाहिद म्हणाले. “त्या काळात त्यांच्याकडे आमच्यासाठी वेळही नव्हता. माझ्या वडिलांबद्दल कोणीही वाईट बोललेलं, मी कधीच सहन करणार नाही. मी गप्प बसणार नाही, मग ते कोणीही असो. माझे वडील माझे वडील होते,” असं शाहिद यांनी बजावलं. रफींना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सकडून सन्मान मिळणार होता, पण लता मंगेशकर यांनी ‘हस्तक्षेप’ केला होता. शेवटच्या क्षणी लता यांना हा सन्मान मिळाल्यावर वडिलांनी हा विषय सोडून दिल्याचं शाहिद यांनी सांगितलं.

आशा भोसलेंना लाज वाटायली हवी – शाहिद रफी

आशा भोसले यांनी रफींच्या आवाजात रेंज नसण्याबद्दल केलेल्या वक्तव्याला शाहिद यांनी थेट उत्तर दिलं. “तुम्ही एक सुशिक्षित आहात; या वयात थोडी लाज बाळगा. हे मी त्यांंना थेट सांगतोय. परमेश्वर सगळं पाहतोय, माझ्या वडिलांबद्दल कोणी वाईट बोललेलं मला सहन होणार नाही,” असं शाहिद म्हणाले. इतकंच नाही तर “तुमचं वय झालंय, आता स्वतःबद्दल बोला,” असंही आशा भोसलेंना उद्देशून शाहिद यांनी म्हटलं.

मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर पुन्हा कधीच एकमेकांशी बोलले नाहीत, असं शाहिद यांनी सांगितलं. पण नर्गिस आणि जयकिशन यांनी सांगितल्यावर त्यांनी लता मंगेशकर यांना माफ केलं होतं, त्यानंतर त्यांनी एकत्र एक कार्यक्रम केला होता. मात्र त्यांचे वैयक्तिक संबंध पुन्हा कधीच आधीसारखे झाले नाही. मोहम्मद रफी यांचे १९८० मध्ये ५५ व्या वर्षी निधन झाले.