मास्टर अलंकार म्हणून लोकप्रियता मिळवणारे मराठमोळे अलंकार जोशी हे प्रसिद्ध बाल-कलाकार होते. ते १९७० च्या दशकातील सर्वात यशस्वी बाल कलाकारांपैकी एक होते. त्यांनी १०० हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांच्या बालपणीच्या भूमिका साकारल्या. ‘दीवार’, ‘मजबूर’, ‘सीता और गीता’ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट होय. बालपणी इतकं यश मिळवणारे अलंकार जोशी आता कुठे आहेत? काय करतात? ते जाणून घेऊयात.

अलंकार जोशी हे अभिनेत्री पल्लवी जोशी यांचे भाऊ आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचे मेहुणे आहेत. फ्रायडे टॉकीजला दिलेल्या मुलाखतीत, पल्लवीने दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या भेटीचा क्षण आठवला. “दीवारसाठी, माझ्या भावाला बोलावण्यात आलं होतं. आम्ही यश जींना भेटायला गेलो होतो. मीही त्यांच्याबरोबर होते. मला थोडंफार आठवतंय. शूटिंग आधीच सुरू झालं होतं. अमितजींनी दादाला पाहिलें आणि म्हणाले, ‘अरे, कसा आहेस?’ मग, त्यांनी यशजींना सांगितलं की याला माझ्या बालपणीची भूमिका द्या. अशा रितीने ‘दीवार’मध्ये दादाला घेण्यात आलं आणि त्याने लहान विजयची भूमिका केली,” असं पल्लवी म्हणाली.

दीवार सिनेमाचा किस्सा

भावाचं निरीक्षण खूप चांगलं होतं, असं पल्लवीने सांगितलं. “त्याच दिवशी त्याने अमितजींना पाहिलं. ‘मैं फेके हुए पैसे नही उठाता’ हा पहिला सीन होता. तो गेला आणि यशजींना म्हणाला की ते त्यांच्या शर्टवर गाठ बांधण्याचा प्रयत्न करत आहे, मीही तेच करायचं का? यशजी म्हणाले, तुझी उत्सुकता कमालीची आहे,” असं पल्लवी म्हणाली.

कुटुंबाचा पाठिंबा खूप महत्त्वाचा – अलंकार जोशी

टाईम्स नाऊला दिलेल्या एका मुलाखतीत, अलंकार यांनी त्यांच्या अभिनयाच्या दिवसांची आठवण सांगितली होती. “दिवसभर काम, रात्रीचे शूटिंग, तुम्ही सार्वजनिक ठिकाणी दिसल्यावर होणारी गर्दी. यासाठी कुटुंबाचा भक्कम पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे. माझ्या आई-वडिलांनी मला महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास मदत केली. मला चांगला अभिनय करायला, कौतुक योग्य पद्धतीने हाताळायला शिकवलं आणि कौतुकानंतर हुरळून जाऊ नकोस असं शिकवलं,” असं अलंकार म्हणाले होते.

बाल-कलाकार म्हणून अलंकार जोशींचा प्रवास चांगला राहिला. मोठे झाल्यावर ते अभिनयाच्या संधी शोधत होते. “मोठा झाल्यानंतर, इतरांप्रमाणेच त्यानेही अभिनयविश्वात कामासाठी प्रयत्न केले. पण नंतर, त्याला जाणवलं की बाल- कलाकार म्हणून जे यश मिळालं ते त्याला मोठेपणी मिळणार नाही. मग तो दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात आला. तो आता एक खूप यशस्वी मराठी चित्रपट निर्माता आहे. पण, त्याला कॅमेऱ्याच्या मागे जाण्यात रस नव्हता,” असं पल्लवी म्हणाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता काय करतात अलंकार जोशी?

अलंकार यांनी या क्षेत्रात काम करताना अभ्यास सुरू ठेवला आणि शिक्षण पूर्ण ठेवल्यावर एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी केली. “त्याने आपले क्षेत्र पूर्णपणे बदलण्याचा निर्णय घेतला. तो सॉफ्टवेअर प्रोग्रामिंगमध्ये गेला. तो अमेरिकेत गेला आणि एका सॉफ्टवेअर कंपनीत दोन वर्षे नोकरी केली. नंतर त्याने मित्रांबरोबर मिळून अमेरिकेत स्वतःची कंपनी सुरू केली. आता ३५ वर्षे झाली आहेत, तो अमेरिकेत आहे. त्याचं सगळं उत्तम चाललंय. त्याला जुळ्या मुली आणि एक मुलगा अशी तीन अपत्ये आहेत,” असं पल्लवी म्हणाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार अलंकार जोशींची एकूण संपत्ती २०० कोटी रुपये आहे.

अलंकार जोशींच्या दोन्ही मुली हॉलीवूडमध्ये काम करत आहेत आणि त्यांचा मुलगा गायक आहे. त्यांची एक मुलगी अनुजा जोशीने अमेझॉन एमएक्स प्लेअर थ्रिलर वेब सीरीज ‘हॅलो मिनी’मध्ये काम केलं आहे. अलंकार जोशींची मोठी बहीण पद्मश्री याही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत.