महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांनी तीन दशकांहून अधिक काळ ‘विशेष फिल्म्स बॅनर’खाली एकत्र चित्रपटांची निर्मिती केली होती. पण २०२१ मध्ये त्यांनी प्रोफेशनली वेगळं व्हायचं ठरवलं, तेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला. १९९० आणि २००० च्या दशकात त्यांनी ‘आशिकी’, ‘सडक’, ‘सर’, ‘राज’, ‘मर्डर’ आणि इतर अनेक हिट चित्रपट बनवले.
४ वर्षानंतर पहिल्यांदाच मुकेश भट्ट यांनी लेहरेन रेट्रोला दिलेल्या मुलाखतीत भाऊ महेश भट्ट यांच्याबद्दल वक्तव्य केलं. महेश भट्टबद्दल आपल्या मनात कोणतीही कटुता नाही. त्यांना माझ्याबद्दल काय वाटतं याची मला कल्पना नाही, पण माझ्या बाजूने असं काहीच नाही, असं मुकेश भट्ट यांनी स्पष्ट केलं.
महेश व मुकेश भट्ट यांनी वर्षानुवर्षे शोषण केल्याचा आरोप विक्रम भट्टने केला होता. त्यांचे आडनाव एकच असले तरी, विक्रम महेश आणि मुकेश यांच्याशी संबंधित नाही. याबद्दल मुकेश म्हणाले, “ते (महेश) भोळे आहेत आणि आम्हा दोघांना कसं वेगळं करता येईल यासाठी लोकांनी फार स्वार्थीपणे प्रयत्न केले होते.” विक्रम भट्टच्या टीकेबद्दल मुकेश म्हणाले “तुला जे म्हणायचं आहे ते म्हण. खरं तर विक्रम भट्टने आधी स्वतःकडे पाहावं, स्वतःचं ऐकावं मग तो बरोबर आहे की चूक याचे उत्तर त्याला मिळेल.”
महेश भट्ट माझे देव आहेत – मुकेश भट्ट
मुकेश भट्ट यांनी महेश भट्ट यांचं कौतुक केलं. “कोणाच्याही बोलण्याचा माझ्यावर परिणाम होणार नाही. महेश भट्ट माझे देव आहेत, ते माझे मोठे भाऊ आहेत. मला वाटलेलं फक्त मृत्यूच आम्हाला वेगळं करेल. मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो आणि नेहमीच करत राहीन. मी हे उगाच बोलत नाहीये, मी ते मनापासून म्हणतोय. मी त्यांच्या प्रेम आणि आनंदासाठी प्रार्थना करतो, कारण ते खूप चांगले आहेत,” असं मुकेश भट्ट म्हणाले.

प्रत्येकात चांगले व वाईट गुण असतात, सवयी असतात. महेश यांच्याबद्दल मुकेश यांनी मत व्यक्त केलं. “माणूस कितीही चांगला असला तरी, प्रत्येकात काहीतरी कमतरता असतात. महेश सहजपणे लोकांच्या बोलण्याने प्रभावित होतात ही त्यांची कमतरता आहे,” असं मुकेश भट्ट आलिया भट्टच्या वडिलांबद्दल म्हणाले.
मुकेश भट्ट यांचा मुलगा विशेष भट्ट इमरान हाश्मीच्या ‘आवारापन २’ ची निर्मिती करत आहे. मुकेश म्हणाले, “जेव्हा या चित्रपटाचं काम सुरू झालं तेव्हा भट्ट साहेबांनी विशेषला एक खास मेसेज पाठवला होता. ‘अभिनंदन, मी तुला मनापासून शुभेच्छा देतो,’ असा तो मेसेज होता. त्यांचा मेसेज आला हे समजल्यावर मला खूप आनंद झाला. त्यांनी विशेषला आशीर्वाद दिल्याबद्दल मला आनंद झाला. माझ्यासाठी, ते फक्त एक मोठे भाऊ नाही, तर ते वडिलांसारखे आहेत. म्हणून त्यांच्याकडून येणारी कोणतीही गोष्ट माझ्यासाठी अमूल्य आहे.”
