दीपिका पादुकोणने मुंबईत आल्यावर मॉडेल म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. त्याच काळात काही म्युझिक व्हिडीओंमध्ये दिसल्यानंतर मुझम्मिल इब्राहिम देखील मॉडेलिंग करत होता. अभिनेता मुझम्मिलने एका मुलाखतीत दावा केलाय की तो दीपिकाबरोबर दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये होता. दोघांच्याही करिअरचे सुरुवातीचे दिवस असल्याने त्यांच्याकडे जास्त पैसे नसायचे, त्यामुळे ते रिक्षाने डेटवर जायचे. दोन वर्षांनंतर मुझम्मिलने दीपिकाशी ब्रेकअप केले होते.
मुझम्मिल ‘धोखा’, ‘विल यू मॅरी मी?’ ‘हॉर्न ओके प्लीज,’ ‘धीमे धीमे’ या चित्रपटांसाठी ओळखला जातो. सिद्धार्थ कन्ननशी बोलताना मुझम्मिल म्हणाला, “आम्ही दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये होतो.” मुंबईत दीपिकाला भेटलेला मुझम्मिल पहिलाच मुलगा होता. त्या काळात दीपिका कशी होती, असं विचारल्यावर तो म्हणाला, “तिला खूप आत्मविश्वास होता, कारण ती प्रकाश पादुकोण यांची मुलगी आहे, त्यामुळे सर्वांना तिच्याबद्दल माहीत होतं.” आपण दीपिकाशी नातं तोडलं, असंही मुझम्मिलने सांगितलं.
मी स्टार होतो, ती आता सुपरस्टार आहे – मुझम्मिल
“मी त्यावेळी स्टार होतो, ती नव्हती. आता ती सुपरस्टार आहे. तिला सगळे ओळखतात, मला कोणीही ओळखत नाही. मी तिचा खूप मोठा चाहता आहे. मला तिचे चित्रपट पहायला आवडतात. ती एक अत्यंत सुंदर स्त्री आहे. ती खूप छान काम करतेय,” असं मुझम्मिल दीपिकाचं कौतुक करत म्हणाला. मुझम्मिल व दीपिका अजूनही एकमेकांच्या संपर्कात आहेत का? असं विचारल्यावर त्याने नकार दिला. “तिचे लग्न होण्यापूर्वी आम्ही कधीकधी बोलायचो,” असं त्याने सांगितलं. ब्रेकअपनंतरही मित्र होतो व कधीकधी एकमेकांचे अभिनंदन करायचो, असं मुझम्मिलने नमूद केलं.
रिक्षाने डेटवर जायचे दीपिका-मुझम्मिल
दीपिकाबरोबर रिलेशनशिपमध्ये असतानाच्या काही आठवणी मुझम्मिलने सांगितल्या. “आम्ही तेव्हा लहान होतो. आम्ही पावसाळ्यात रिक्षाने डेटवर जायचो. ते क्षण खूप गोड होते. तेव्हा माझ्याकडे तिच्यापेक्षा जास्त पैसे होते, कारण मी चांगलं कमवू लागलो होतो. नंतर मी एक कार विकत घेतली, त्यावेळी तिला खूप आनंद झाला होता. या सगळ्या चांगल्या आठवणी आहेत, कारण तेव्हापासून मी रिक्षाने डेटवर गेलो नाही आणि आमच्याकडे पैसे नसतानाही आम्ही खूप आनंदी होतो,” असं मुझम्मिल म्हणाला.
मुझम्मिल दीपिकाच्या वाढदिवसासाठी पैसे नसतानाही तिची आवडती गाणी वाजवून घ्यायचा. “पैसे नसतानाही, डीजे तिला आवडणारं गाणं वाजवत असे, कारण मी त्यांच्याशी मैत्री करायचो. तिच्या वाढदिवसाला डीजे दीड तास तिची आवडती गाणी वाजवायचा,” असं मुझम्मिलने सांगितलं.