Akshay Oberoi on Vivek Oberoi: ज्येष्ठ अभिनेते सुरेश ओबेरॉय १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून चित्रपटसृष्टीत काम करीत होते. तरीही त्यांना तितकीशी लोकप्रियता मिळाली नाही. मात्र, त्यांचा मुलगा जेव्हा विवेक ओबेरॉय अभिनय क्षेत्रात आला, त्यावेळी त्याला मोठी लोकप्रियता मिळाली.

त्यानंतर काही वर्षांतच विवेकचा चुलतभाऊ अक्षय ओबेरॉयनेदेखील बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. पण, त्याला स्टार असलेल्या विवेककडून कोणतीही मदत मिळाली नाही, असे वक्तव्य अक्षय ओबेरॉयने एका मुलाखतीत केले आहे.

अक्षय ओबेरॉय काय म्हणाला?

अक्षय ओबेरॉयने नुकतीच ‘सायरस सेज’ ( Cyrus Says)च्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्याला विचारले गेले की, जेव्हा त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले, त्यावेळी भाऊ विवेकची मदत का घेतली नाही? त्यावर अक्षय म्हणाला, “दुर्देवानं, त्यावेळी माझ्या आणि विवेकमध्ये फारसा संवाद नव्हता. म्हणजे मी फोन करून त्याला काही सांगितले, असे झाले नाही. मी कधीच त्याच्याकडून मदत मागितली नाही. त्यानेदेखील मला मदत हवी आहे का, असे स्वत:हून विचारले नाही.”

“खूप काळापर्यंत लोकांना हे माहित नव्हते की आम्ही एकाच कुटुंबातील आहोत, आम्ही एकमेकांचे चुलत भाऊ आहोत. पण, आता मला थोडी लोकप्रियता मिळत आहे, तर लोकांना हे माहित होत आहे की मीसुद्धा त्याच ओबेरॉय कुटुंबातील आहे.”

अभिनेत्याला जेव्हा विचारले की विवेक आणि त्याचे कुटुंब एकमेकांच्या संपर्कात आहे का? यावर अक्षय म्हणाला, “ते फारसे एकमेकांच्या संपर्कात नाही. पण, पूर्वीपेक्षा त्यांच्यात चांगले संबंध आहेत. मला वाटते की जुन्या पिढीतील लोक वृद्ध होते. त्यांना याची जाणीव होत आहे की भूतकाळात जे काही घडले ते सोडून दिले पाहिजे. मला खात्री आहे की त्यांच्या पंजाबी अहंकारामुळे त्यांच्यात वाद-विवाद झाले असीतल.”

विवेक किंवा ओबेरॉय कुटुंबाकडून कोणतीही मदत मिळाली नसली तरीही अक्षयने कृतज्ञता व्यक्त केली. तो म्हणला, “मी त्यांच्याप्रति कृतज्ञ आहे. कारण- त्यांच्या यशामुळे मला असे वाटू लागले, हे माझ्यासाठीदेखील शक्य आहे. मला त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली. पण, त्यांच्याकडून कोणतीही मदत मिळाली नाही.”

अक्षय ओबेरॉयच्या कामाबद्दल बोलायचे तर त्याने हृतिक रोशची प्रमुख भूमिका असलेल्या फायटर या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती. तसेच, तो लवकरच जान्हवी कपूर व वरुण धवन यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती.