Nana Patekar was to Create World Record: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे नुकतेच ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या चित्रपटात रितेश देशमुख, श्रेयस तळपदे, अक्षय कुमार, जॅकी श्रॉफ असे अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत दिसले. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. नाना पाटेकरांच्या भूमिकेचे कौतुकही झाले.

नाना पाटेकरांनी मराठीसह बॉलीवूडमध्येदेखील एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जवळजवळ ४७ वर्षे ते बॉलीवूडमध्ये काम करत आहेत. १९७८ साली त्यांचा पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. ‘गमन’ असे या चित्रपटाचे नाव होते. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांत वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केले आहे. त्यांच्या काही भूमिका आणि डायलॉग गाजले आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, एका चित्रपटाद्वारे नाना पाटेकर वर्ल्ड रेकॉर्ड तयार करणार होते. पण, असे होऊ शकले नाही. आता नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेऊ…

नाना पाटेकर करणार होते वर्ल्ड रेकॉर्ड

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित एका चित्रपटात नाना पाटेकर काम करणार होते. दिग्दर्शक मेहुल कुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होते. मेहुल कुमार यांना गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या सिनेमाचे नाव नोंदवायचे होते. मेहुल कुमार यांना फक्त १८ तासांत या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करत वर्ल्ड रेकॉर्ड करायचा होता. ३५ कॅमेरे, १८ युनिट वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी शूटिंग करतील, असा त्यांच्या डोक्यात विचार होता. नाना पाटेकर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असल्याने हा रेकॉर्ड त्यांच्या नावावरही झाला असता.

या चित्रपटाची घोषणा करण्यात आली, मात्र चित्रपटाचे शूटिंग झाले नाही. मेहुल कुमार यांची कल्पना प्रत्यक्षात आली नाही. जरी या चित्रपटाद्वारे नाना पाटेकर वर्ल्ड रेकॉर्ड बनवू शकले नाहीत, तरी त्यांच्या कारकि‍र्दीमध्ये त्यांच्या कामासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २०१३ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नाना पाटेकरांच्या कामाबाबत बोलायचे तर त्यांच्या ‘हाऊसफुल ५’मधील त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले. मात्र, त्याआधी त्यांची प्रमुख भूमिका असलेला ‘वनवास’ या चित्रपटाला मात्र फारसे यश मिळवता आले नाही. आता लवकरच ते ‘अर्जुन उस्तरा’ या चित्रपटात दिसणार आहेत. सध्या ते या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत.