Neena Gupta Vivian Richards Affair : नीना गुप्ता व विवियन रिचर्ड्स यांचं अफेअर ९० च्या दशकात प्रचंड चर्चेत राहिलं होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूबरोबरच्या अफेअरमधून गरोदर राहिल्यावर नीना यांचं आयुष्य सोपं नव्हतं. ‘सच कहूं तो’ या आत्मचरित्रात नीना यांनी याबद्दल सांगितलं आहे. गरोदर असल्याचं समजल्यावर आनंद झाला होता, पण बाळाला जन्म द्यायचा की नाही त्याबद्दल विवियन रिचर्ड्स यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला होता, असं नीना यांनी पुस्तकात लिहिलंय.

नीना यांनी पुस्तकात सांगितलंय की त्या पहिल्यांदा विवियन यांना जयपूरच्या महाराणींनी आयोजित केलेल्या डिनर पार्टीत भेटल्या होत्या. एक दिवसाआधी विवियन यांना क्रिकेट खेळताना पाहिलं आणि नंतर त्यांची भेट झाली होती. पण विवियन परत गेल्यावर दोघेही एकमेकांच्या संपर्कात नव्हते. त्यांनी एकमेकांचे नंबर घेतले नव्हते त्यामुळे संपर्क करू शकले नाहीत.

पुन्हा भेट अन् अफेअर

काही काळानंतर नीना व विवियन पुन्हा दिल्ली विमानतळावर भेटले आणि त्यांचे अफेअर सुरू झाले. “विवियन आणि माझं अफेअर होतं आणि मी गरोदर राहिले. जेव्हा मला हे कळले त्याआधीच तो घरी निघून गेला होता. काही लोकांनी मला गर्भपात करण्याचा सल्ला दिला. तर काहींनी एकटीने बाळाचा सांभाळ करण्याचे धोके सांगितलं. मी सर्वांचं म्हणणं शांतपणे ऐकलं. ते सगळे खूप काळजीत होते, पण मग मी घरी परतल्यावर स्वतःला प्रश्न विचारले. तुला काय वाटतं? हे सगळं तुला कसं वाटतंय? आणि उत्तर होतं – मी खूप आनंदी आहे,” असं नीना म्हणाल्या.

विवियन यांना फोन केला अन्…

गरोदर असण्यासंदर्भात विवियन यांच्याशी बोलायला हवं, हा विचार नीना यांनी केला. त्यांनी विवियन यांना विचारलं की त्या बाळापासून काही अडचण आहे का? “मला माहीत होतं की या परिस्थितीत निर्णय घेण्याचा मला एकटीला अधिकार नाही. बाळाचे वडील विवियनला तेवढाच अधिकार होता. म्हणून, मी एके दिवशी त्याला फोन केला आणि त्याच्याशी बराच वेळ बोलले. ‘मी गरोदर आहे’, असं मी त्याला सांगितलं. ‘जर मी तुझ्या बाळाला जन्म दिला तर तुझ्यासाठी अडचणीचं ठरेल का?’ असं मी विचारलं. विवियनला आनंद झाला होता आणि मी बाळाला जन्म द्यावा असं त्याने सांगितलं. यानंतर मला खात्री पटली की मी योग्य निर्णय घेतलाय. मला हे बाळ हवं होतं, पण बाळाचे वडील तयार नसतील तर मला पुढे जायचं नव्हतं. त्यामुळे जेव्हा विवियनने माझ्या निर्णयाला पाठिंबा दिला तेव्हा मला दिलासा मिळाला,” असं नीना गुप्ता म्हणाल्या.

Neena Gupta continued affair with crickter Vivian Richards
विवियन रिचर्ड्स व नीना गुप्ता (फोटो – इन्स्टाग्राम)

“मसाबाच्या जन्मानंतर विवियन शक्य त्या सगळ्या गोष्टीत सहभागी झाला. आम्हा दोघांचं नातं वेगवेगळ्या टप्प्यांमधून गेलं. त्यावेळी विवियन विवाहित होता. आमचं नातं काही वर्षे असंच होतं. आमच्या नात्यात काही सुंदर क्षण होते, त्याचबरोबर वाईटही होते. आमचं नातं लाँग डिस्टन्स आणि वेगळ्या प्रकारचं होतं,” असं नीना यांनी पुस्तकात लिहिलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नीना गुप्ता यांनी लेक मसाबाला सिंगल मदर म्हणून वाढवलं. ५९ व्या वर्षी नीना यांनी विवेक मेहराशी लग्न केलं. विवेक सीए आहेत. मसाबा अभिनेत्री व फॅशन डिझायनर आहे. नुकतीच ती आई झाली, तिच्या मुलीचं नाव मतारा आहे.