Nick Jonas Priyanka Chopra : लोकप्रिय अमेरिकन गायक व प्रियांका चोप्राचा पती निक जोनसने त्याच्या बेडरूममधील सवयी सांगितल्या. ३२ वर्षीय निकने टिकटॉकची स्पेशल सीरिज ‘आर यू ओके?’ हजेरी लावली. यावेळी निकने सांगितलं की तो बेड फक्त झोपण्यासाठी वापरतो. प्रियांका आजूबाजूला असताना तो कशा पद्धतीने अॅडजस्ट करतो, तेही त्याने नमूद केलं. निकचा यासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
निक जोनसच्या बेडरूममधील सवयी
“मला वाटतं बेड फक्त झोपण्यासाठी असतात. मी बेडवर बसत नाही, मी बेडवर जेवत नाही, मी बेडवर पुस्तक वाचत नाही किंवा टीव्ही पाहत नाही. मी त्यातलं काहीच बेडवर करू शकत नाही,” असं निक म्हणाला. निकला त्यामागचं कारण विचारण्यात आलं. “मला उबदार बेड आवडत नाही, मला उकडतं,” असं कारण त्याने सांगितलं. तसेच निकने कबूल केलं की जेव्हा प्रियांकाला बेडवर पडून टीव्हीवर काहीतरी पाहायचं असतं तेव्हा तो तिच्याबरोबर बसत नाही. त्याऐवजी, तो प्रियांका जिथे झोपलेली असते, तिथे बेडच्या शेजारी खुर्ची घेऊन बसतो.
होस्ट ब्री मोरालेसने निकची ही सवय म्हणजे वेडेपणा आहे असं म्हटलं. निकचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहते त्यावर विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिले, “प्रियांका बेडवर टीव्ही पाहत असताना खुर्ची घेऊन बसणे हा वेडेपणा आहे.” तर काहींनी म्हटलं की त्याला बेडवर खायला आवडत नसावं. काहींनी “निक प्रियांकापेक्षा जास्त भारतीय” आहे असं गमतीत म्हटलं. भारतात बऱ्याच महिलांना मुलांनी बेडवर जेवलेलं आवडत नाही, अशा कमेंट्स काहींनी केल्या आहेत. अनेकांनी निकच्या या सवयीचं कौतुक केलं आहे.
निकला कुटुंबाबरोबर वेळ घालवायला खूप आवडतो. त्याचे कॉन्सर्ट व टूर नसतात तेव्हा तो घरी पत्नी प्रियांका व मुलीबरोबर वेळ घालवतो. तो कामाचा ताण विसरून घरी आराम करतो. तसेच फावल्या वेळेत प्रियांका व निकला फिरायला जायला खूप आवडतं. दोघेही मुलगी मालतीला घेऊन जगभरातील विविध ठिकाणी प्रवास करत असतात.
निक व प्रियांका यांची पहिली भेट २०१७ मध्ये झाली होती. त्यावेळी प्रियांकाला वाटलं की निकने तिला फ्रेंड-झोन केलंय, कारण ती मेट गालामध्ये ४५ मिनिटे उशिरा आली होती. नंतर निकने प्रियांकाला सोशल मीडियावर मेसेज केला होता. दोघांचं बोलणं सुरू झालं आणि मग ते डेटवर गेले. थोडा वेळ एकत्र घालवल्यानंतर दोघांनी डिसेंबर २०१८ मध्ये लग्न केलं. दोघांचे लग्न हिंदू व ख्रिश्चन पद्धतीने झाले होते.
लग्नानंतर चार वर्षांनी २०२२ मध्ये निक व प्रियांकाने त्यांची पहिली मुलगी मालती मेरी हिचे स्वागत केले. मालतीचा जन्म सरोगेसीद्वारे झाला. प्रियांका व निक दोघेही त्यांच्या लेकीची खूप काळजी घेतात. प्रियांका शूटिंगसाठी जाते तेव्हा मुलीला सोबत नेते. तर बरेचदा ती मालतीला घेऊन निकच्या कॉन्सर्टलाही हजेरी लावते.