काजोलची ‘द ट्रायल’ मधील सह-कलाकार नूर मालाबिका दास हिचं निधन झालं आहे. ती तिच्या मुंबईतील अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळली होती. तिच्या मृत्यूबद्दल कुटुंबियांना कळवण्यात आलं पण त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही, त्यानंतर पोलिसांनी एका एनजीओच्या मदतीने तिच्यावर अंत्यसंस्कार केले. आता पहिल्यांदाच तिच्या मृत्यूबद्दल कुटुंबातील सदस्याने प्रतिक्रिया दिली आहे. इतकंच नाही तर नूरने आत्महत्येसारखं पाऊल का उचललं, यामागचं संभाव्य कारणही सांगितलं.
नूर नैराश्यात होती आणि करिअरमध्ये ती तिच्या कामाबद्दल असमाधानी होती. नूर मूळची बांगलादेश सीमेजवळ असलेल्या आसाममधील करीमगंज शहरातली होती. ती अभिनयात करिअर करायचं ठरवून मुंबईत आली होती. ६ जून रोजी नूरचा मृतदेह पोलिसांनी जप्त केला आणि त्यानंतर तिच्या निधनाची बातमी समोर आली होती. आता तिच्या काकूने तिच्या मृत्यूबद्दल मौन सोडलं आहे.
सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “आजकालची मुलं आई-वडिलांची…”
‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना अभिनेत्रीची करीमगंज इथं राहणारी काकू आरती दासने सांगितलं की नूर अभिनयात करिअर करण्यासाठी मोठ्या आशेने मुंबईला गेली होती. तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती खूप मेहनत करत होती, पण ती तिच्या कामाबद्दल असमाधानी होती आणि त्यामुळे नैराश्यात होती, याच कारणाने तिने टोकाचे पाऊल उचललं असावं, असा दावा आरती दासने केला.
३७ वर्षांची नूर लोखंडवालामध्ये एका अपार्टमेंटमध्ये राहत होती. शेजाऱ्यांनी ओशिवरा पोलीस स्टेशनला तिच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर पोलीस तिथे आले आणि त्यांनी फ्लॅटमध्ये प्रवेश केला. पोलिसांना नूरचा कुजलेला मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. मिड डे ने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी तिच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र कोणीही प्रतिसाद दिला नाही, त्यानंतर पोलिसांनी ममदानी हेल्थ अँड एज्युकेशन ट्रस्ट एनजीओच्या मदतीने रविवारी तिचे अंत्यसंस्कार केले.
अभिनयात करिअर करण्यापूर्वी नूर एअरहोस्टेस होती. ती मूळची आसामची होती. तिने अनेक वेब सीरिज आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यात ‘सिसकियां’, ‘वॉकमन’, ‘तिखी चटनी’, ‘जघन्या उपाय’, ‘चरमसुख’, ‘देखी अनदेखी’, ‘बॅकरोड हलचल’ या चित्रपटांचा समावेश आहे. ती शेवटची काजोल आणि जिशु सेनगुप्ता यांच्या ‘द ट्रायल’मध्ये दिसली होती. नूर सोशल मीडियावर खूप सक्रिय होती आणि तिचे लाखो फॉलोअर्स होते. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या कामाबद्दल बऱ्याच पोस्ट आहेत.