ज्येष्ठ निर्माते आणि वितरक पहलाज निहलानी यांनी १९८० आणि ९० च्या दशकात अनेक हिट चित्रपट दिले. पण ते त्यांच्या चित्रपटांपेक्षा २०१५ ते २०१६ या काळात सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे (सीबीएफसी) अध्यक्ष म्हणून जास्त चर्चेत राहिले. २०१६ मध्ये अभिषेक चौबेच्या ‘उडता पंजाब’मध्ये त्यांनी काही दृश्ये हटवण्यास सांगितलं होतं, ते न हटवल्यास प्रमाणपत्र देणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली होती.
पहलाज निहलानी यांनी आता एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत ‘उडता पंजाब’च्या वादाबद्दल ते बोलले. ‘उडता पंजाब’चे सह-निर्माते, ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र आणि बालाजी मोशन पिक्चर्सचे सीईओ हे मी सुचवलेले कट्स करून प्रमाणपत्र घेण्यासाठी सीबीएफसी कार्यालयात आले होते, पण सह-निर्माता अनुराग कश्यप त्यावेळी तो चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ इच्छित नव्हता; कारण तो पुरेसा चर्चेत नव्हता.
“जिथे गरज होती तिथेच चित्रपटाची भाषा आम्ही बदलली होती. जिथे गरज होती तिथेच कट सुचवले होते. आम्ही फक्त त्यातल्या शिव्या हटवल्या होत्या, चित्रपटातील एकही दृश्य बदलण्यास सांगितलं नव्हतं,” असा दावा निहलानी यांनी पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत केला. ‘उडता पंजाब’ चित्रपटाची चर्चा वाढवण्यासाठी वाद निर्माण करणं हा अनुराग कश्यपच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा एक भाग होता, असं वक्तव्य निहलानी यांनी केलंय.
निहलानींच्या मते, त्यांच्या काळात त्यांनी सिस्टिम सुरळीत ठेवण्यासाठी जसं काम केलं, तसं आता कोणीच करत नाहीत. तसेच ‘A’ (Adults Only) हे प्रमाणपत्र तीन सब कॅटेगरींमध्ये विभागले पाहिजे, कारण सुरुवातीच्या काळात बिकिनी दृश्य असेल तरी त्यासाठी ‘A’ प्रमाणपत्र आवश्यक असायचे, असा दावा त्यांनी केला.
प्रसून जोशी ऑफिसला जात नाहीत- निहलानी
“आता सीबीएफसीचे अध्यक्ष प्रसून जोशी आहेत. ते पटकथा लेखक आणि गीतकार आहेत. प्रसून ऑफिसला जात नसल्याने आज सीबीएफसीमध्ये खूप तणाव आहे. आताचे सीईओ चांगले आहेत. किमान त्यांच्यामुळे सीबीएफसीमध्ये काम होतंय. पण प्रसून हे पहिले अध्यक्ष आहेत ज्यांनी सात वर्षांहून अधिक काळ ऑफिसला न जाता काम केलंय. ते सात दिवस तरी ऑफिसला गेले आहेत का?” असा प्रश्न पहलाज निहलानी यांनी उपस्थित केला.
विवेक ओबेरॉय काय म्हणाला होता?
२०१६ मध्ये निहलानी यांना पदावरून हटवण्यात आंल होतं. त्यावेळी प्राइम व्हिडीओ इंडियाचा पहिला ओरिजिनल शो इनसाइड एजचा भाग असलेला अभिनेता विवेक ओबेरॉयने एक मोठं वक्तव्य केलं होतं. आता ओटीटीवरील शो करणं दिलासादायक आहे, कारण त्यानंतर त्याला निहलानींशी डील करावं लागणार नाही, असं विवेक पिंकव्हिलाशी बोलताना म्हणाला होता. त्यावर पहलानी यांनी आता उत्तर दिलंय.
निहलानी यांनी दिलं उत्तर
“विवेक ओबेरॉय जेव्हा जेव्हा मला भेटतो, तेव्हा तो खूप प्रेमाने भेटतो. आता जर तो काही बोलत असेल तर…पण आता त्याला चित्रपट मिळत आहेत का? जर त्याला अश्लीलता आवडत असेल तर त्याने ती त्याच्या वैयक्तिक आयुष्यात करावी. चित्रपटांमध्ये का करावी?” असं निहलानी म्हणाले.
निहलानी यांनी दावा केला की त्यांना २००२ मध्ये आणि गेल्या वर्षीच पुन्हा एकदा सीबीएफसीमध्ये काम करण्याची ऑफर देण्यात आली होती. परंतु त्यांनी ती नाकारली. कारण सीबीएफसीमधील काम कृतघ्न असल्याचं निहलानी यांना वाटतं.