‘हेरा फेरी’, ‘फिर हेरा फेरी’ या चित्रपटांनी प्रेक्षकांना पोट धरून हसवलं. हे दोन्ही चित्रपट हिंदीतील गाजलेले कॉमेडी चित्रपट आहेत. आजही या चित्रपटांची क्रेझ कमी झालेली नाही. या चित्रपटातील राजू, शाम व बाबू भैया या त्रिकुटानेतर प्रेक्षकांना खळखळून हसवलं होतं; त्यामुळे या त्रिकुटाचा चाहतावर्गही मोठा आहे. यामधील अक्षय कुमार, सुनील शेट्टी व परेश रावल यांचा ऑनस्क्रीन बॉंड प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. आता या चित्रपटाचा पुढचा भाग ‘हेरा फेरी ३’सुद्धा येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अशातच आता या चित्रपटाबद्दलची एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेते परेश रावल चर्चेत आहेत. यादरम्यान त्यांनी काही मुलाखती दिल्या, त्यातील त्यांची वक्तव्यं सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली. अशातच आता परेश रावल यांनी ‘हेरा फेरी ३’ चित्रपटाबद्दलही खुलासा केला आहे. ‘बॉलीवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी याबाबत सांगितलं आहे. या मुलाखतीत त्यांना ‘तुम्ही चित्रपटाचा भाग नाही आहात का’, असा प्रश्न विचारण्यात आला.
यामध्ये त्यांनी प्रश्नाचं उत्तर देत, “हो, हे खरं आहे. कायदेशीर अडचणी, वेळापत्रकातील अडचणी आणि कलाकारांच्या अडचणी, हा कदाचित चित्रपटाला सध्या भेडसावणारा मोठा अडथळा आहे,” असं म्हटलं आहे. ‘हेरा फेरी’, ‘फिर हेरा फेरी’ यात परेश रावल यांनी साकारलेल्या बाबू भैया या भूमिकेने अनेकांचं लक्ष वेधलं; तर या भूमिकेचा एक वेगळाच चाहतावर्गही आहे. चित्रपटात ही भूमिका साकारत परेश रावल यांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं.
‘बॉलीवूड हंगामा’च्या वृत्तानुसार चित्रपटाचे निर्माते व परेश रावल यांच्यामध्ये वैचारिक मतभेद असून यामुळे परेश रावल यांनी या चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे. याच कारणामुळे काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारनेदेखील असाच निर्णय घेतला होता, परंतु नतंर त्याने या चित्रपटासाठी होकार दिला.
चित्रपटातील परेश रावल यांच्या भूमिकेला जरी प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला असला, त्या भूमिकेमुळे ते प्रसिद्धीझोतात आले असले तरी परेश रावल यांनी ‘लल्लन टॉप’शी संवाद साधताना ‘हेरा फेरी’मधील बाबू भैयाची भूमिका त्यांच्यासाठी अडचणीची ठरल्याचं म्हटलं आहे.