अभिनेत्री परिणीती चोप्राने आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांच्याशी २४ सप्टेंबर रोजी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला दोन महिन्यांहून जास्त काळ झाला आहे. पती राजकारणात असल्याने परिणीती भविष्यात कधी राजकारणात येईल का, याबाबत तिला प्रश्न विचारण्यात आला. यावेळी तिने काय उत्तर दिलं, ते जाणून घेऊयात.
परिणीती वडोदरामध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. तिथे ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत तिला राजकारणात येण्याबद्दल विचारण्यात आलं. परिणिती चोप्रा म्हणाली, “आमच्या यशस्वी वैवाहिक जीवनाचे रहस्य मी तुम्हाला सांगते. त्याला बॉलीवूडबद्दल काहीच माहिती नाही आणि मला राजकारणाविषयी काहीही माहिती नाही. त्यामुळे तुम्ही मला राजकारणात येताना पाहाल असं मला वाटत नाही. आम्ही दोघंही सार्वजनिक जीवन जगत असलो तरी देशभरातून आम्हाला इतकं प्रेम मिळेल याची कल्पनाही नव्हती. मला असं वाटतं की तुम्ही योग्य व्यक्तीबरोबर असाल तर वैवाहिक जीवन खूप सुंदर आहे.”
काम आणि आयुष्याचा समतोल खूप महत्त्वाचा आहे, असं परिणीती सांगते. “काम व आयुष्याचा योग्य समतोल साधणं खूप महत्त्वाचं आहे. कामात व्यग्र असल्यामुळे वेळेवर जेवले नाही किंवा झोपले नाही, याबद्दल भारतात आपण अनेकदा अभिमानाने बोलतो. पण वैयक्तिकरित्या, जीवन जगण्याचा हा योग्य मार्ग आहे असं मला वाटत नाही. मी खरोखर कठोर परिश्रम करण्यावर विश्वास ठेवते, परंतु मला माझ्या मित्रांना भेटायला आणि सुट्टीवर जायलाही आवडते. जेव्हा मी ८५ किंवा ९० वर्षांची असेन तेव्हा मला मागे वळून पाहताना मला असं वाटलं पाहिजे की मी माझं आयुष्य जसं जगायला पाहिजे होतं तसंच जगले आहे.”
दरम्यान, लग्नानंतर परिणीती ‘मिशन रानीगंज’ चित्रपटात झळकली. या चित्रपटात अक्षय कुमारची मुख्य भूमिका होती. येत्या काळात परिणीती ‘चमकीला’ या चित्रपटात दिसणार आहे.