Parineeti Chopra Talk’s About Raghav Chadha : परिणीती चोप्रा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचं २०२३ रोजी राजकारणी राघव चड्ढा यांच्याशी लग्न झालं. त्यावेळी दोघांच्या प्रेमकहाणीबद्दल अनेकदा चर्चा केली जायची. अशातच आता या जोडीनं नुकतीच एक मुलाखत दिली आहे. त्यामध्ये परिणीतीनं राघव यांच्याबद्दल सांगितलं आहे.
परिणीती व राघव यांनी ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ला हजेरी लावली होती. यादरम्यान परिणीतीनं राघवशी लग्न करण्यापूर्वी तिनं त्यांच्याबद्दल काही गोष्टी गूगल केल्याचं राघव यांनीच सांगितलं आहे. कपिलनं परिणीती व राघव यांना त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल विचारलं होतं. परिणीती त्याबद्दल म्हणाली, “आम्ही पहिल्यांदा लंडन येथे भेटलो होतो. आम्हाला ब्रिटिश काउन्सिलकडून पुरस्कार मिळणार होता. त्याला त्याच्या राजकीय कारकिर्दीसाठी आणि मला अभिनय क्षेत्रातील कामासाठी.”
परिणीती पुढे म्हणाली, “माझे दोन्ही लहान भाऊ त्याचे मोठे चाहते आहेत आणि त्यांनी मला राघवला त्यांच्याकडून ‘हाय’ बोलायला सांगितलं होतं. योगायोगानं तो माझ्या शेजारीच बसला असल्यानं मी त्याच्याकडे गेले आणि त्याला ‘हाय’ केलं. तेव्हा मी त्याला सहज म्हटलं होतं की, दिल्लीत गेल्यानंतर आपण एकदा भेटायला हवं. त्यानंत लगेच दुसऱ्याच दिवशी त्यांनं मला न्याहारीसाठी आमंत्रण दिलं.”
‘अशी’ होती परिणीती व राघव चड्ढा यांची पहिली भेट
परिणीती पुढे म्हणाली, “मी पाच जणांना माझ्याबरोबर घेऊन गेले होते. त्याच्याबरोबरही त्याचे दोन सहकारी होते. त्यामुळे आम्ही जवळपास १२-१५ लोक होतो तेव्हा. नंतर त्यानं माझा फोन नंबर घेतला आणि मग आमचं बोलणं सुरू झालं. पहिल्या भेटीपासूनच आम्ही लग्नाबद्दल बोलत होतो. तो पहिल्या भेटीतच माझ्या प्रेमात पडला होता. जेव्हा मी त्याला भेटले तेव्हा मला वाटलं की, मी याच्याशी लग्न करणार आहे. तोपर्यंत मला राघवबद्दल काहीही माहीत नव्हतं”.
परिणीती चोप्राने राघव चड्ढा यांच्याबद्दल गूगल केलेल्या ‘या’ गोष्टी
राघव पुढे परिणीतीबद्दल म्हणाले, “तिनं मला अनेकदा सांगितलं आहे की, पहिल्या भेटीनंतर तिनं माझ्याबद्दल गूगलवर जाऊन माहिती मिळवली होती. तिनं माझं वय, माझं लग्न वगैरे झालंय का?, संस्देतील सदस्यांची कामं काय असतात या सर्व गोष्टी तिनं जाणून घेतल्या होत्या”. पुढे परिणीती म्हणाली, “मी त्याची उंची किती आहे हेसुद्धा गूगल केलं होतं. कारण- मला पूर्वीपासूनच उंच पुरुष आवडायचे. तो माझ्यापेक्षा उंच होता. त्यामुळे मला वाटलं तो माझ्यासाठी योग्य आहे.”
परिणीती पुढे म्हणाली, “आम्ही पुढच्या तीन-चार महिन्यांनंतर रोका केला आणि नंतर पुढे लग्न केलं.” राघव व परिणीती यांनी २४ सप्टेंबर २०२३ मध्ये लग्न केलं. आता लवकरच त्यांच्या लग्नाला दोन वर्षं पूर्ण होणार आहेत. सध्या अभिनेत्री गरोदर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्याबद्दल कपिल शर्माच्या कार्यक्रमात राघव म्हणाले, आम्ही लवकरच आनंदाची बातमी देऊ”.