Popular Actor on marriage troubles: अर्चना पूरण सिंह सध्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये दिसत आहे. अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक बॉलीवूड चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तिचे यूट्यूब चॅनेलदेखील आहे. या चॅनेलवर अभिनेत्री तिच्या खासदी आयुष्यातील अनेक गोष्टी सांगताना दिसते. आता अर्चना पूरण सिंहचा पती अभिनेता परमित सेठीने त्यांच्या लग्नाबद्दल वक्तव्य केले आहे.
अभिनेता काय म्हणाला?
परमित सेठीने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर मुलगा आर्यमनशी गप्पा मारताना त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या. भारत- पाकिस्तानच्या फाळणीनंतर त्याचे वडील पाकिस्तानातून भारतात आले. त्याचे वडील मूळचे पाकिस्तानातील गुजरांवाला येथील होते. त्याचा जन्म दिल्लीत झाला.
१९८४ च्या दंगलींबद्दल अभिनेता म्हणाला की, शीख विरोधी दंगलीत काकांचा आणि चुलत भावाचा मृत्यू झाला. तो भाऊ माझ्या जवळचा होता. भावाच्या मृत्यूनंतर, अगदी लहान वयातच मी माझे केस कापण्याचा निर्णय घेतला.
परमित पुढे म्हणाला की, नंतरच्या काळात मी माझ्या पालकांबरोबर मुंबईत आलो, मी शर्ट विकायचो. मी दिल्लीतील माझ्या काकांच्या कारखान्यातून ते शर्ट विकत घेत असे आणि ते मुंबईत विकत असे. मी कॉलेजच्या काळात हे काम सुरू केले, कारण त्यावेळी कुटुंबात खूप आर्थिक अडचणी होत्या. माझ्या बालपणात मी माझ्या वडिलांना आर्थिक अडचणींचा सामना करताना पाहिले होते, त्यामुळे मी त्यांच्याकडे पैसे मागत नसे.”
याच व्हिडीओमध्ये परमित सेठींनी अर्चना पूरण सिंह यांच्याबरोबरच्या लग्नाबाबतही वक्तव्य केले. एक जोडपे म्हणून त्यांना काही कठीण काळाचादेखील सामना करावा लागला. परमित सेठी असेही म्हणाले, “आमच्यात खूप भांडणे होत असत. त्यानंतर मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स केला. अर्चनाने तो कोर्स करण्यासाठी मला सांगितले. पती पत्नी म्हणून आम्ही आनंदी नव्हतो. आम्ही खूप भांडत असू. त्या कोर्सनंतर गोष्टी बदलल्या. माझ्या मनातल्या गोष्टी मी मोकळेपणाने बोलू लागलो. माझी बहिणीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते, तिच्यासाठी मी पहिल्यांदा मोठ्याने रडलो. मी मोकळेपणाने रडू शकलो.” अशी आठवण परमित सेठीने सांगितली.
दरम्यान, अर्चना पूरन सिंह व परमित सेठी यांनी ३० जून १९९२ ला लग्नगाठ बांधली. परमित सेठीने अर्चना पुरन सिंह यांच्यापेक्षा वयाने लहान आहेत. त्यांच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी आल्याचे अभिनेत्याने म्हटले असले तरी आता ते एकमेकांबरोबर आनंदाने आयुष्य जगत असल्याचेदेखील अभिनेता म्हणाला.