Pooja Bhatt Created Toxic Environment On Set Says This Actor : पूजा भट्ट ९० च्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर तिनं अनेक चित्रपटांत काम केलं आहे. अभिनयासह ती दिग्दर्शिकासुद्धा आहे. अशातच आता बॉलीवूडमधील एका लोकप्रिय अभिनेत्यानं तिच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

पूजा भट्टने ‘पाप’, ‘हॉलिडे’, ‘धोका’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. त्यातील ‘धोका’ चित्रपटात झळकलेला अभिनेता मुझम्मील (Muzammil Ibrahim) इब्राहिमनं पूजाबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. मुझम्मीलनं चित्रपटात काम करण्यापूर्वी तो एक लोकप्रिय मॉडेल होता. त्यानंतर त्यानं ‘धोका’ चित्रपटांत काम करीत बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.

मुझम्मीलनं ‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीत पूजा भट्टबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. तो म्हणाला, “मी पूर्वी कधीच इतक्या तणावपूर्वक वातावरणात काम केलं नव्हतं. कधीच इतके वाईट शब्द ऐकले नव्हते. पण, या चित्रपटात काम करण्याचा माझा अनुभव फार वाईट आहे. अशा वातावरणात काम करणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. माझ्याकडे काही पर्याय नव्हता. कारण- माझ्या घरात पैसे कमावणारी मी एकमेव व्यक्ती होतो. माझ्यावर असलेल्या जबाबदाऱ्यांमुळे मला त्यावेळी खूप सहन करावं लागलं आणि मी खूप त्रासलेला असायचो. मला जवळ जवळ मरणयातना होत होत्या. ती खूप मोठी माणसं असल्यानं मला त्यांच्याविरोधात काहीच बोलता आलं नाही.”

मुझम्मील पुढे पूजा भट्टबद्दल म्हणाला, “चित्रपटाच्या दिग्दर्शिकेमुळे मला खूप त्रास झाला. टीम वगैरे सगळं छान होतं; पण फक्त तिच्यामुळे त्रास झाला. या चित्रपटानंतर भट्ट साहेबांनी मला तीन चित्रपट ऑफर केले; पण मला आलेल्या अनुभवामुळे मी ते करण्यास नकार दिले. तिनं माझ्याविरोधात माध्यमांनाही खोट्या गोष्टी सांगितल्या. तिचं असं म्हणणं होतं की, कलाकारानं श्वानाप्रमाणे असावं, उठ म्हटलं की उठावं, बस म्हटलं की बसावं. पूर्वी ती खूप समजूतदार होती; पण मला माहीत नाही की, असं काय घडलं की, ती इतकी बदलली.”

महेश भट्ट यांच्याबद्दल मुझम्मील म्हणाला, “भट्टसाहेबांसाठी ती त्यांची मुलगीच होती. ती माझ्यापेक्षाही २० वर्षांनी मोठी होती; पण त्या लोकांसाठी त्यांची मुलं ही लहानच असतात. त्यांनी काहीही केलं, कितीही चुका केल्या तरी. पण, जर आम्ही चुकलो, तर सगळा दोष आमच्यावर टाकला जायचा. हा चित्रपट महेश भट्ट यांनीच दिग्दर्शित केलेला. ते बराच वेळ सेटवर असायचे. ते असताना मला त्रास नाही व्हायचा. जेव्हा ते नसायचे तेव्हा मला खूप त्रास व्हायचा. विशेषकरून गाण्यांच्या चित्रीकरणादरम्यान आणि अॅक्शन सीनच्या वेळी. कारण- त्यांना यामध्ये फार रस नसायचा. त्यामुळे तिनंच हे चित्रीकरण केलं.”

“पूजानं मला त्रास देण्याचा प्रयत्न केला. कारण- मी तिच्या मनाप्रमाणे वागत नव्हतो. आम्ही ते सांगितलं तसंच करावं, अशी त्यांची इच्छा होती. परंतु, मी तसं न केल्यामुळे त्यांनी माझ्याबद्दल चुकीच्या बातम्या छापल्या, चुकीची माहिती पसरवली. माझं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला. मला त्यामुळे खूप त्रास झाला.”