७०-८० च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकणारे अभिनेते म्हणजे शत्रुघ्न सिन्हा. चित्रपटांमधील नानाविध भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केले होते. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारे शत्रुघ्न सिन्हा आणखी एका कारणामुळे चर्चेत होते ते म्हणजे उशिरा येण्याच्या. शत्रुघ्न सिन्हा आपल्या कामाबाबत अजिबातच वक्तशीर नव्हते.

शत्रुघ्न सिन्हा यांनी कामाच्या ठिकाणी नेहमीच उशिरा जाण्याची सवय होती. याबद्दल त्यांच्या सहकलाकारांनी अनेक किस्से सांगितले आहेत. अशातच अभिनेत्री पूनम ढिल्लन यांनीही कपिल शर्माच्या शोमध्ये त्यांच्या उशिरा येण्याच्या सवयीबद्दल सांगितलं होतं. यावेळी पूनम यांनी मी माझं अर्ध आयुष्य त्यांची वाट पाहण्यातच घालवलं आहे असंही म्हटलं.

शत्रुघ्न सिन्हांबद्दल त्यांनी शोमध्ये असं म्हटलेलं, “दोन टॉप हिरो होते; गोविंदा आणि शत्रुघ्न सिन्हा. मी त्यांच्याबरोबर अनेकदा काम केले आहे. शत्रुजींबरोबर मी पाच-सहा चित्रपट केले आहेत. मला वाटतं की, मी माझे अर्धे आयुष्य त्यांची वाट पाहण्यात वाया घालवले आहे. ते सकाळी ९ वाजताच्या शिफ्टसाठी संध्याकाळी ४ वाजता यायचे.”

तसंच एका मुलाखतीत चंकी पांडे यांनी खुलासा केला होता की, शत्रुघ्न सिन्हा नेहमीच जाणूनबुजून उशिरा येत असत. चंकी यांनी रेडिओ नशाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, “शत्रूजींनी मला एक छान गोष्ट सांगितली होती ती म्हणजे ‘बेटा, तू काहीही कर, पण कुठेही वेळेवर पोहोचू नकोस. जर तू वेळेवर जात असशील तर कोणीही तुला महत्त्व देणार नाही. एखाद्या ठिकाणी तू लवकर पोहोचलास तरी १५ मिनिटे गाडीतच थांब.”

याउलट अमिताभ बच्चन हे खूप वक्तशीर होते. शत्रुघ्न सिन्हा यांच्याबरोबर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. एकदा बच्चन यांनी सिन्हा यांच्या उशिरा येण्याच्या सवयीबद्दल म्हटले होते की, “आम्ही ‘शान’ आणि ‘नसीब’ या दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम करत होतो. आम्ही एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या शिफ्ट करायचो, पण वेगवेगळ्या चित्रपटांसाठी. आम्ही सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत ‘शान’साठी शूटिंग करायचो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापुढे त्यांनी असं म्हटलं होतं की, “रात्री २ वाजता, आम्ही दोघेही ‘नसीब’च्या सेटवर पोहोचण्यासाठी आपापल्या गाड्यांमधून सेटवरून निघायचो. मी दुपारी २:३० वाजता सेटवर पोहोचायचो. पण शत्रु ५-७ तासांनी उशिराने पोहोचायचा. पण तो कुठे गायब झाला होता हे आम्हाला आजपर्यंत माहित नाही.” दरम्यान, शत्रुघ्न सिन्हांच्या उशिरा येण्याच्या सवयीमुळे ते स्वत:च्या लग्नातही उशिराच पोहोचले होते.